स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
By नामदेव मोरे | Updated: December 16, 2025 22:38 IST2025-12-16T22:35:25+5:302025-12-16T22:38:54+5:30
रोडवर फिरताना सापडली महिला; महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय

स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिबीडी महानगर पालिकेच्या रात्रनिवारा केंद्रात वास्तव्य करणाऱ्या महिलेने ती क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा केला आहे. स्मृतिभ्रंश झालेल्या या महिलेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. तिचा दावा खरा की खोटा याविषयी संभ्रम असून सद्यस्थितीत तिच्यावर निवारा केंद्राकडून उपचार सुरू आहेत. सीबीडी पोलिसांना २६ नोव्हेंबर रोजी एक महिला रोडवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी महिलेला महानगर पालिकेच्या घणसोली रात्रनिवारा केंद्रात भरती केले. त्या महिलेने तिचे नाव रेखा श्रीवास्तव असल्याचे सांगितले. क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा त्या महिलेने केला. माझ्याकडे बंगला, गाडी सर्व होते पण ते सर्व गेले. काही परिचितांनी हडप केल्याचे त्या महिलेने सांगितले.
सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविषयी रात्रनिवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, पण अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. सद्यस्थितीत या महिलेवर मनपा रूग्णालयात उपचार सुरू असून रात्रनिवारा केंद्रात राहण्याची सोय केली आहे.
सीबीडी पोलिसांनी २६ नोव्हेंबरला स्मृतिभ्रंश झालेली महिला निवारा केंद्रात भरती केली आहे. ही महिला ती सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. पण आम्हाला तशी अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तिचा सांभाळ व उपचार केला जात आहे.
-राहुल वाढे, व्यवस्थापक बेघर निवारा केंद्र, घणसोली