वीरोबाचं चांगभलं ... या जयघोषाने दुमदुमले महाड
By Admin | Updated: March 12, 2016 02:12 IST2016-03-12T02:12:05+5:302016-03-12T02:12:05+5:30
वीरोबाचं चांगभलं.... झोलूबाईचं चांगभलं या जयघोषात ढोलनगाऱ्याच्या निनादात भक्तांचा उत्साह गुरु वारी मध्यरात्री अक्षरश:

वीरोबाचं चांगभलं ... या जयघोषाने दुमदुमले महाड
महाड : वीरोबाचं चांगभलं.... झोलूबाईचं चांगभलं या जयघोषात ढोलनगाऱ्याच्या निनादात भक्तांचा उत्साह गुरु वारी मध्यरात्री अक्षरश: शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवाची शुक्रवारी सकाळी पारंपरिक रूढी-प्रथेप्रमाणे लळिताच्या कीर्तनाने सांगता झाली. संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेल्या या छबिना व यात्रोत्सवात इतक्या प्रचंड संख्येने गर्दी होऊनही पोलीस यंत्रणा तसेच वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नियोजनबद्ध यंत्रणेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील ठिकठिकाणच्या ग्रामदेवतांच्या पालख्या लाडक्या वीरेश्वराच्या भेटीसाठी मंदिर परिसरात दाखल झाल्या. मध्यरात्रीनंतर विन्हेरेच्या झोलाईदेवीच्या पालखीचे आगमन झाले. त्यावेळी तर ढोलताशाच्या तालावर नृत्य करणाऱ्या भक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. देवीचा गोंधळ विधीही उत्साहात पार पडला. पहाटे साडेचारपर्यंत वीरेश्वर महाराजांची सर्व देवदेवतांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरात आकाशाला भिडणाऱ्या सासणकाठ्या खांद्यावर घेऊन ठेक्यात नाचवण्याचा सोहळा तर सर्वांचेच आकर्षण ठरले. या मिरवणुकीत माजी आ. माणिक जगताप, देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, विश्वास अनंत शेठ, रमेश नातेकर, उपनगराध्यक्ष सुदेश कलमकर, दीपक वारंगे आदींसह महाडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)