खांदा वसाहतीतील नालेसफाई कधी?
By Admin | Updated: May 31, 2017 06:20 IST2017-05-31T06:20:54+5:302017-05-31T06:20:54+5:30
मे महिना संपत आला तरी अद्याप खांदा वसाहतीतील नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांना सुरुवात

खांदा वसाहतीतील नालेसफाई कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : मे महिना संपत आला तरी अद्याप खांदा वसाहतीतील नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यंदा बहुतांश ठिकाणच्या सफाईची कामे कागदावरच राहण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात नवनिर्वाचित नगरसेवक संजय भोपी यांनी सिडको कार्यालयात जावून निवेदन दिले आहे. या मागणीची दखल घेत सिडकोकडून बुधवारी या कामांना सुरुवात करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक बनले आहे. अन्यथा हे नाले, गटारे तुंबून वसाहतीमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. खांदा वसाहतीत नेमके ही कामे कशामुळे रखडली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या सिडको वसाहतीत दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. आता मे महिना संपत आला, मात्र आजतागायत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खांदा वसाहतीत जवळपास २५ कि.मी पेक्षा जास्त लांबीचे नाले आहेत. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा या नाल्यामध्ये होतो. त्याची जोडणी होल्डिंग पाँडला करण्यात आलेली आहे. मात्र नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि कचरा जातो त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबते.
या व्यतिरिक्त प्लास्टिक जावून
अडकत असल्याने पाण्याला अडथळे निर्माण होतो.
२६ जुलै २००५ मध्ये नाले तुंबल्यामुळे वसाहतीत पाणी भरले त्यामध्ये मोठी हानी झाली. नालेसफाई झाली नसल्याचे मुख्य कारण पुढे आले तेव्हापासून सिडको दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमध्ये साचलेली माती, गाळ आणि कचरा बाहेर काढते. हे काम स्थानिक मजूर संस्थांना दिले जाते. परंतु या वर्षी खांदावसाहतीत अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन अपेक्षित आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. असे असताना सिडकोने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नालेसफाई करून उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. यासंदर्भात नगरसेवक संजय भोपी यांनी सिडको कार्यालयात जावून पत्र दिले, तसेच अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली. या कामाकरिता ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. बुधवारपासून कामाला युध्दपातळीवर सुरुवात करून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर काम पूर्ण करू असे आश्वासन सिडकोकडून भोपी यांना देण्यात आले.