डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढणार तरी केव्हा?
By Admin | Updated: November 13, 2014 23:11 IST2014-11-13T23:11:31+5:302014-11-13T23:11:31+5:30
येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-5 वरील रुळांच्या स्लीपर्स दोन वर्षापूर्वी नव्याने टाकल्यापासून या ठिकाणीही लोकलमध्ये प्रवेश करताना गॅपची समस्या भेडसावत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढणार तरी केव्हा?
डोंबिवली : येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-5 वरील रुळांच्या स्लीपर्स दोन वर्षापूर्वी नव्याने टाकल्यापासून या ठिकाणीही लोकलमध्ये प्रवेश करताना गॅपची समस्या भेडसावत आहे. यामुळे डोंबिवलीकर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
यासंदर्भात माजी खासदार आनंद परांजपे आणि आमदार रवींद्र चव्हाण आदींनी सातत्याने ही समस्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांच्या निदर्शनास आणूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी फलाट क्रमांक-5 वर दिव्याच्या दिशेने रुळांसह काही तांत्रिक कामे सुरू आहेत. त्यातच स्लीपर्स टाकण्याचेही काम करण्यात आले आहे. हा अप दिशेकडील जलद गतीचा मार्ग आहे. या ठिकाणाहून सकाळी साडेसहापासून दुपारी चार-साडेचार्पयत गाडी पकडण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्या गर्दीत गाडीत प्रवेश करताना प्रवाशांना लोकलमधील दरवाजाच्या खांबाला पकडून वर चढावे लागत आहे. अशातच एखाद्या प्रवाशाचा तोल गेला तर अपघाताची शक्यता आहे. अनेकांना गाडीत चढता येत नसल्याने अल्पावधीत गाडी सुटण्याचीही भीती असते. याबाबत, अनेकांनी आमदार चव्हाण यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून ते मात्र याकडे म्हणावे तितके गांभीर्याने बघत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवडय़ातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निगम यांच्यासह विठ्ठलवाडी स्थानक पाहणी दौरा केला होता. मात्र, त्यांनी डोंबिवली स्थानकाचा पाहणी दौरा का केला नाही, असा सवालही येथील महिलांसह ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार, त्याततरी आमच्या समस्यांवर तोडगा निघेल काय असा सवाल प्रवाशांना पडत आहे.
(प्रतिनिधी)