When a baby is born, it must cry | बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे

बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे

मुरुड : गर्भधारणापूर्व व जन्मपूर्व निदान प्रतिबंधक कायदा १९९४ या विषयी माहिती सांगितली, तसेच मुलीच्या लग्नाचे वय २१ असणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलगी ही पदवीधर असली पाहिजे. बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे, त्यावरूनच त्याचा बुद्ध्यांक वाढणार आहे. मुलाचे रडणे म्हणजेच त्याचा गोल्डन टाइम समजला जातो, अशी माहिती मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप यांनी दिली.

महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने मुरुड येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातर्फे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या कार्यक्रमाचे आयोजन मुरुड पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशिका ठाकूर यांच्या हस्ते महात्मा गांधी व सावित्री बाई फुले यांच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी, एकात्मिक बालविकासचे विस्तार अधिकारी संजय शेडगे, पोलीस शिपाई आरती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आज २१व्या शतकातही मुलींना जन्माला येऊ दिले जात नाही. यासाठीच शासनाकडून असे कार्यक्रम राबवून जनजागृती करावी लागत आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे. स्त्रीभ्रूणाचे संरक्षण करणे खूप आवश्यक आहे. रूढी व परंपरेत अडकलेला माणूस महिलांनी फक्त चूल व मूल सांभाळावी, अशी अपेक्षा करीत आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने मुलींचे जन्मताच स्वागत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखलेल्या असून, त्या पद्धतीने शासकीय पातळीवर कार्यवाही होत असते, असे पर्यवेक्षिका शुभांगी कोतवाल यांनी सांगितले. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरुडतर्फे मुलींविषयी जनजागृती होण्यासाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्ण चांदोरकर, अश्विनी पाटील, विजयता खेऊर, उज्ज्वला भाटकर, कामिनी म्हात्रे, मनीषा ठाकूर आदींनी विशेष मेहनत घेतली.

प्रेरणा भगत यांच्या निबंधास प्रथम क्रमांक : मुरुड तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रेरणा प्रवीण भगत यांनी माझी मुलगी माझा स्वाभिमान या विषयावर सर्वोत्कृष्ट निबंध लिहिला. त्यांना मुरुड तालुक्यामधून प्रथम क्रमांक देण्यात येऊन, त्यांना मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशिका ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: When a baby is born, it must cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.