स्वागत कमानी जैसे थे!
By Admin | Updated: September 24, 2015 00:41 IST2015-09-24T00:41:02+5:302015-09-24T00:41:02+5:30
रोडवर अनधिकृतपणे बॅनर व स्वागत कमानी बांधणाऱ्या राजकीय पक्षांच्या मंडळांना महापालिका प्रशासनाने अभय दिले आहे.

स्वागत कमानी जैसे थे!
नवी मुंबई : रोडवर अनधिकृतपणे बॅनर व स्वागत कमानी बांधणाऱ्या राजकीय पक्षांच्या मंडळांना महापालिका प्रशासनाने अभय दिले आहे. रोडवर खड्डे काढून व व्यावसायिक जाहिराती लावल्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
गणेशोत्सव मंडळांना रोडवर परवानगी देण्यात येवू नये. रोडवर खड्डे काढून स्वागत कमानी उभारू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याशिवाय अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. परंतु शहरात राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात २ हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग लावले आहेत. जवळपास १ हजार स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. वाशीमध्ये राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कमानींचा विक्रमच केला आहे. महामार्गापासून शिवाजी चौकापर्यंत प्रत्येक दहा फुटावर कमानी लावण्यात आल्या आहेत. सेक्टर १७ मधील अंतर्गत रोडवरही पूर्णपणे कमानी लावल्या आहेत. या कमानी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी नसून मंडळांना देणगी देणाऱ्यांच्या जाहिराती त्यावर लावण्यात आल्या आहेत. मंडळांनी लाखो रूपये कमावले असून त्यांच्या कमाईसाठी रोडवर खड्डे खणले आहेत. ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, सीबीडी सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्या दबावामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील छोट्या मंडळांनी उभारलेल्या अनधिकृत कमानींना नोटिसा पाठविल्या आहेत. अनेकांवर कारवाई केली आहे. राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना मात्र अभय दिले जात आहे. यामुळे शहरातील दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेचे अधिकारी राजकारण्यांना घाबरत असून सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. राजकारण्यांची मर्जी राखण्यासाठी रोडवर खड्डे खणल्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)