‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’चे रायगडात स्वागत
By Admin | Updated: February 16, 2016 02:45 IST2016-02-16T02:45:32+5:302016-02-16T02:45:32+5:30
भारत व आॅस्ट्रेलिया या दोन देशांमधील पर्यटन तसेच मैत्रिपूर्ण संबध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी स्पिरीट आॅफ इंडिया रन-२०१६ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी मंत्री पॅट फॉर्मर

‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’चे रायगडात स्वागत
अलिबाग : भारत व आॅस्ट्रेलिया या दोन देशांमधील पर्यटन तसेच मैत्रिपूर्ण संबध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी स्पिरीट आॅफ इंडिया रन-२०१६ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी मंत्री पॅट फॉर्मर हे देशातील विविध शहरांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह दौड करीत आहेत. रविवारी पॅट फॉर्मर व त्यांच्या सहकाऱ्यांचे रायगड जिल्ह्यातील आंबेत येथे महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांनी स्वागत केले. स्पिरीट आॅफ इंडिया रनचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभा करणे व जनजागृती करणे हे असल्याचे स्वागतानंतर पॅट फॉर्मर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
पॅट फॉर्मर हे ९ ते १९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत देशातील विविध शहरांमधून ही दौड करीत आहेत. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून दौड सुरू करून ते म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे पोहोचले. यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गजरात तसेच आदिवासींच्या पारंपरिक टिमकी वाद्याने रायगड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. आंबेत ग्रामस्थांच्या वतीने खालीद झटाम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
स्पिरीट आॅफ इंडिया रन ही पॅट फॉर्मर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कन्याकुमारीपासून सुरू केली आहे. दररोज ८० किलोमीटर ही दौड होत आहे. (विशेष प्रतिनिधी)