रेल्वेचा बुधवार ठरला शून्य अपघातांचा
By Admin | Updated: November 18, 2016 02:36 IST2016-11-18T02:40:06+5:302016-11-18T02:36:53+5:30
कल्याण-ठाणेदरम्यान बुधवारी एकही अपघाताची नोंद झाली नाही. त्यामुळे हा दिवस शून्य अपघाताचा ठरला.

रेल्वेचा बुधवार ठरला शून्य अपघातांचा
अनिकेत घमंडी / डोंबिवली
मध्य रेल्वेवर वाढत्या प्रवाशांच्या संख्येबरोबर अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. अपघात रोखण्यासाठी सर्व स्तरांवर विविध उपाययोजना, जागृती केली जात असली तरी दिवसाला सरासरी आठ ते १० जणांचा मृत्यू होतो. तर, तितकेच प्रवासी जखमी होतात. मात्र, कल्याण-ठाणेदरम्यान बुधवारी एकही अपघाताची नोंद झाली नाही. त्यामुळे हा दिवस शून्य अपघाताचा ठरला.
कल्याण-ठाणे मार्गावर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही लोहमार्ग पोलीस ठाणी येतात. त्यांच्या हद्दीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील ऐरोली, दिवा-वसई मार्गावरील भिवंडी दुसरीकडे निळजे तसेच कसारा आणि बदलापूरपर्यंतचा परिसर येतो. या हद्दीत रेल्वे फाटक तसेच रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
ठाकुर्ली येथे होणारे अपघात रोखण्यासाठी फाटकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील अपघातांचे प्रमाण शून्यावर आले आहे. ठाण्यात फलाट क्रमांक-२ च्या पुढे सिडको स्टॉपकडे रुळांतून चालणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे तेथेही पोलीस नेमण्यात आला आहे. परिणामी, प्रवाशांनी आता रुळांतून चालणे बंद केले आहे. रूळ ओलांडताना गाड्यांच्या धडकेत तसेच सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी गाड्यांमधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
फलाट आणि गाडीतील गॅपमध्ये अडकून तोल जाणे, छतावर बसून प्रवास करणे, धावती गाडी पकडणे अथवा उतरणे यामुळेही अपघात घडत आहेत. हे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन वारंवार जागृती तसेच उपाययोजना करत आहे. प्रवाशांनी स्वत:हूनच त्यांचा जीव धोक्यात घालवू नये, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाची आहे.