लेणी बंद असतानाही सोमवारी जलवाहतूक; दहा वर्षांपासून पर्यटकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:11 IST2024-12-21T11:11:22+5:302024-12-21T11:11:48+5:30
मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : घारापुरी लेण्यांच्या देखभालीसाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी लेण्या बंद ठेवण्यात येत आहेत. असे ...

लेणी बंद असतानाही सोमवारी जलवाहतूक; दहा वर्षांपासून पर्यटकांची फसवणूक
मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : घारापुरी लेण्यांच्या देखभालीसाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी लेण्या बंद ठेवण्यात येत आहेत. असे असतानाही गेल्या दहा वर्षांपासून देशी-विदेशी पर्यटकांची फसवणूक करून लाँच मालक स्वत:चे खिसे भरत आहेत. लेण्यांचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुरातत्त्व विभागाने घारापुरी लेणी देखभालीसाठी सोमवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही गेट वे ऑफ इंडिया येथून सोमवारीही लेण्या पाहण्यासाठी शेकडो देशी-विदेशी पर्यटकांना नेले जाते. घारापुरी लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बंद असल्याने लेण्या पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.
‘जेएनपीए’ची श्रद्धांजली
मुंबई ते घारापुरीदरम्यानच्या नीलकमल या खासगी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या अपघातातमृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पर्यटकांना शुक्रवारी (२०) जेएनपीएच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ‘जेएनपीए’चे अध्यक्ष उन्मेष वाघ, सचिव तथा प्रशासन विभागाच्या वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव, कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटकांची फसवणूक टाळण्यासाठी व लाँचचालक सोमवारी पर्यटकांना बेटावर घेऊन येणार नाहीत यासाठी बंदर विभागाने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. - कैलास शिंदे, केअरटेकर, घारापुरी लेणी, पुरातत्त्व विभाग