धोकादायक मार्केटवर पाण्याची टाकी
By Admin | Updated: August 26, 2015 22:55 IST2015-08-26T22:55:27+5:302015-08-26T22:55:27+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोकादायक ठरलेल्या कांदा मार्केटमध्ये दुकानांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. नियमबाह्यपणे टाकी बसविण्यासाठी

धोकादायक मार्केटवर पाण्याची टाकी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोकादायक ठरलेल्या कांदा मार्केटमध्ये दुकानांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. नियमबाह्यपणे टाकी बसविण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमध्ये ९२ धोकादायक वास्तूंमध्ये कांदा - बटाटा मार्केटचा समावेश आहे. मार्केटमधील व्यापारी गाळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून मार्केटचा वापर बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक विंगमध्ये कँटीनची सोय केली आहे. सामुदायिक नळ दिला असून ठिकठिकाणी पाणपोयी उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक विंगमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. यामुळे व्यक्तिगत नळजोडणी देण्यात आलेली नाही.
नियमाप्रमाणे कोणालाही वैयक्तिक नळजोडणी देता येत नाही व गाळ्यांवर पाण्याची टाकी बसविण्याची परवानगीही दिली जात नाही. परंतु नियम डावलून ई व इतर विंगमध्ये काही व्यापाऱ्यांनी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे बसविलेल्या काही टाक्या काढण्यात आल्या परंतु अद्याप काही ठिकाणी टाक्या जैसे थे असून संबंधितांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.
एपीएमसीतील व्यापारी महादेव राऊत यांनी अधिकृतपणे पाण्याची टाकी बसविण्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यांना अशाप्रकारे पाण्याची टाकी बसविण्याची परवानगी दिली जात नसल्याचे लेखी उत्तर प्रशासनाने दिले आहे. परंतु दुसरीकडे ज्यांनी अनधिकृतपणे टाक्या बसविल्या आहेत त्यांना मात्र अभय दिले जात असून यामुळे मार्केटमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांना समान नियम लावण्यात यावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेची नोटिस
मार्केटमधील व्यापारी गाळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. मार्केटचा वापर बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे.
व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक विंगमध्ये कँटीनची सोय केली आहे. प्रत्येक विंगमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. यामुळे व्यक्तिगत नळजोडणी देण्यात आलेली नाही.