पाणीपुरवठा योजना कागदावरच
By Admin | Updated: March 11, 2016 02:39 IST2016-03-11T02:39:04+5:302016-03-11T02:39:04+5:30
तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे.

पाणीपुरवठा योजना कागदावरच
अलिबाग : तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा पाटील यांनी दिला आहे.
याच प्रकरणी पाटील हे दोन वेळा उपोषणाला बसले होते. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांनी पाटील यांची फक्त आश्वासनावरच बोळवण केल्याचे दिसून येते. रेवस पाणीपुरवठा योजनेसाठी २७ लाख १२ हजार २९९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. ५ एप्रिल २०११ ला रेवसच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे ती वर्ग करण्यात आल्याचे १८ जुलै २०१३ च्या प्रशासकीय कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र असे असतानाही प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांचे ५ जानेवारी २०१६ ला अहवाल मागविण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.
पाणीपुरवठा योजना सुरु होती, तर एप्रिल-मे २०१५ मध्ये ग्रामपंचायत फंडातून रेवस गावासाठी ५० हजार रुपये खर्च का करावा लागला? या योजनेची कूपनलिका कावेडे येथे असल्याने वास्तविक तेथे पंपघर आणि विद्युत जोडणी असणे आवश्यक होते मात्र तेथे पंपघर आणि विद्युत जोडणीच नाही, अशी सर्व परिस्थिती असताना योजना पूर्ण कशी झाली, असे विविध प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत. यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे, अन्यथा आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. उपअभियंता आर. एस. माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.