नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: September 5, 2015 03:09 IST2015-09-05T03:09:31+5:302015-09-05T03:09:31+5:30
एमजेपीकडून वारंवार घेण्यात येणारे शटाडाऊन तसेच जलशुद्धी केंद्रावर सुरू असलेला विजेचा लपंडाव, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे गेल्या काही

नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाई
पनवेल : एमजेपीकडून वारंवार घेण्यात येणारे शटाडाऊन तसेच जलशुद्धी केंद्रावर सुरू असलेला विजेचा लपंडाव, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सिडको वसाहतीत खंडित पाणीपुरवठा होत आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे नवीन पनवेलमधील नागरिक त्रस्त असून, सेक्टर-६ मधील परिस्थित अतिशय बिकट आहे.
नवीन पनवेल आणि कळंबोली नोडला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र ते पनवेल यादरम्यान टाकलेल्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. झोपडपट्टीधारकांकडूनही अनेकदा या जलवाहिन्या फोडण्यात येतात. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही वाढला आहे. सुमारे २५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे एमजेपीनेही मान्य केले आहे.
फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एमजेपीकडून सातत्याने शटडाऊन घेण्यात येत असल्याने सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. गुरुवारी एमजेपीने शटडाऊन घेऊन तीन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती केली. सिडकोने केलेल्या दाव्यानुसार, याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली होती. मात्र जलवाहिन्यांची दुरुस्ती झाल्यावर भोगरपाडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पंपहाऊस बंद पडले. अखेर शुक्रवारी सकाळी दहानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. अशीच परिस्थिती खांदा वसाहत आणि कळंबोलीत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने इमारतीत वरच्या मजल्यावर पाणी पोचले नाही. नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे, मात्र ते एमजेपीकडे बोट दाखवीत असल्याचे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण तावदारे यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)