पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याने गळती सुरू
By Admin | Updated: December 8, 2015 00:28 IST2015-12-08T00:28:03+5:302015-12-08T00:28:03+5:30
गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतु, महापालिकेला आणि नागरिकांनासुद्धा पाणीटंचाईचे

पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याने गळती सुरू
दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतु, महापालिकेला आणि नागरिकांनासुद्धा पाणीटंचाईचे गांभीर्य न कळल्याने अनेक ठिकाणी पाणीगळती सुरू असून हजारो लीटर्स पाणी वाहून जात आहे.
सध्या मंगळवारी व शनिवारी शासकीय आदेशानुसार पाणीपुरवठा बंद आहे. खरे म्हणजे एकूण चार दिवस लोकांना पाणी मिळत नाही. काही भागात आजही लोकांना पाणी भरपूर मिळत असून काही भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. महानगरपालिका उल्हास नदीवरील मोहने बंधाऱ्यामधून मोहने उदंचन केंद्राद्वारे १४७ द.ल.ली. प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण (पूर्व) व (पश्चिम) या भागात नागरिकांना वितरीत केले जाते.
तसेच उल्हास नदीवरील उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उचलले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात वितरीत केले जाते. पण, कल्याण पूर्व भागात अंदाजे ३.५० लक्ष लोकसंख्येच्या तुलनेने इतर भागांपेक्षा कमी पुरवठा होत असल्याबद्दल पूर्वच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अनेक वेळा धारेवर धरले होते. तरीही पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही.
कल्याण पूर्वचे पाणीपुरवठा उपअभियंता अशोक घोडे यांना पाणीगळतीसंदर्भात विचारणा केली असता जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमधून ते पाणी वाहत असते. अशा भागातील गळती होत असलेल्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षणानुसार बदली करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १५० एमएमच्या २०० मीटर लांबीचे, १०० एमएमच्या १५० मीटर लांबीचे व ८० एमएमच्या २०० मीटर लांबीचे बदलीचे प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच कामामध्ये रस्त्यावरील व्हॉल्व्हचे चेंबर केले जाणार आहेत. ६२ इमारतींचे कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४० ते ५० विहिरी पडक्या आहेत. अनेक विहिरींची कचराकुंडी झाली आहे. खासगी मालकांच्या ज्या विहिरी आहेत, त्यांचा बंदिस्त करून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापर केला जातो. महापालिकेने पडक्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्या उपयोगात आणण्यासाठी पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात करता येईल.
कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईची दखल चाळवासीय गांभीर्याने घेऊन पाणीसाठा करून ठेवतात. परंतु, इमारती आणि इमारतींच्या संकुलांमध्ये काय अवस्था आहे? गाड्या धुण्यापासून बगिच्यांना भरपूर पाणी खर्च होते.
सर्वच नागरिकांनी भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन काटकसरीने वापर करायला हवा, असे सोसायटी आणि चाळ कमिटीचे पदाधिकारी यांनी वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जाते. बांधकामे सर्रास सुरू आहेत.
त्याचप्रमाणे बेकायदेशीर नळजोडण्या लावण्याचे कामही सुरू आहे. ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागातर्फे आशेळे गावातील मुख्य जलवाहिनीवरील नांदिवली व चिंचपाडा गावातील ४० ठिकाणी असलेल्या अनधिकृत जोडण्या ग्रामस्थांच्या मदतीने तोडल्याची माहिती देण्यात आली.