प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर
By Admin | Updated: October 9, 2016 03:28 IST2016-10-09T03:28:47+5:302016-10-09T03:28:47+5:30
स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचा दिखावा करू लागली आहे. शहरात विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबर विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. हागणदारीमुक्त शहर बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी पुरेशी शौचालये उभारण्यापूर्वीच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोज एक ते दोन विभागांत जाऊन महापालिकेचे अधिकारी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून महापालिकेच्या कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येत आहे. रोज किती जणांवर कारवाई केली याचा तपशील प्रसारमाध्यमांकडे पाठविला जात आहे. परंतु दुसरीकडे कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. उपलब्ध प्रसाधनगृहांची साफसफाई ठेवली जात नाही. कारवाई करण्यापूर्वी पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मनपाने बांधलेल्या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल केली जात नाही. एपीएमसीमध्ये मनपाच्या प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. अनेक संस्थांचा देखभालीचा ठेका संपल्यानंतरही नवीन ठेकेदारांची नियुक्ती केलेली नाही. अनेक प्रसाधनगृहे मोडकळीस आली आहेत.
पाठपुरावा करूनही दुरुस्ती नाही
राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ येथील नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्टर ६मधील उद्यानाजवळ पालिकेने बांधलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी नवरात्रीपासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रामलीला मैदानाजवळील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजेही बसविले जात नसून प्रशासन फक्त शहरात होर्डिंग लावून ‘हागणदारीमुक्त शहरा’ची घोषणा करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.