शहरात दोन ठिकाणी भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:38 IST2019-07-26T23:38:28+5:302019-07-26T23:38:59+5:30
सानपाडात भुयारी मार्गात पाणी : सीवूडमध्ये दुकानावर वृक्ष कोसळला

शहरात दोन ठिकाणी भिंत कोसळली
नवी मुंबई : शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली. भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
नवी मुंबई परिसरामध्ये गुरुवारी २४ तासांमध्ये ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. एक ठिकाणी शॉर्टसर्किट व एक ठिकाणी आग लागली होती. शुक्रवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सहा ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. सीवूडमध्ये एका दुकानावर वृक्ष कोसळला. सेक्टर ४८ मधील प्रियदर्शनी सोसायटीजवळील मोकळ्या भूखंडावरील संरक्षण भिंतही कोसळली. नेरुळ सेक्टर १५ मधील गंगा-जमुना सोसायटी आवारामध्येही संरक्षण भिंत कोसळली.
शहरातील बहुतांश भुयारी मार्गामध्ये पाणी साचले होते. पामबीच रोडवरील करावे येथील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे तेथून ये-जा करणे अशक्य झाले होते. महामार्गावरून सानपाडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील भुयारी मार्गामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या ठिकाणी अनेक वाहने अडकली होती. कोपरखैरणेसह इतर ठिकाणीही अशीच स्थिती झाली होती. भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी मोटरपंप बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी केली आहे.
पनवेलमध्ये १६१ मि.मी.पाऊस
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारीही पनवेलमध्ये कायम होता. सायंकाळी उशिरानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागले. सायन-पनवेल महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले होते, तर पनवेल-सीएसटी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही उशिराने सुरू होती. पनवेल तालुक्यात १६१ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद दिवसभरात करण्यात आली. पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत तसेच ग्रामीण भागात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तालुक्यातील कासाडी, गाढी तसेच कर्णावती नदी दुथडी भरून वाहत होती. सायन-पनवेल महामार्गावर खारघर, कामोठे, कळंबोली या ठिकाणी दोन लेन पाण्याखाली गेल्या होत्या. १४ वर्षांपूर्वी याच दिवशी सर्वत्र महापूर आला होता. या दिवसाची आठवण शुक्रवारच्या पावसाने करून दिली.