शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची
By Admin | Updated: December 10, 2015 02:00 IST2015-12-10T02:00:42+5:302015-12-10T02:00:42+5:30
महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे

शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे इतरही शेतीला दरवर्षी नुकसान होत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे फक्त तुडील विभागातच शासनाकडून करण्यात आले असून दासगाव विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा अद्याप नुकसानभरपाईमध्ये विचार न केल्याने या विभागातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दासगाव विभागातील शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात रायगड जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असल्याची माहिती अध्यक्ष तुकाराम शंकर देशमुख यांनी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. येथील कारखान्यातून घातक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत होते. या घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी तुडील आणि दासगाव मधील शेतजमीन नापीक झाली. शेती नापीक होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती ओसाड पडली आहे.
२०१० व त्यानंतर खाडीपट्टीतील तुडील विभागातील सात गावातील शेतकऱ्यांचे उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे महाड महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त केले होते. त्यावेळी महाड औद्योगिक वसाहतीकडे नुकसानीची मागणीही केली होती, मात्र दासगावच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.
खाडीलगतच्या दोन्ही बाजूतील शेती रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २०१० मध्ये व त्यानंतर शासनाकडून फक्त तुडील विभागातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी दासगाव ते दाभोळ याही विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या केमिकल्सच्या पाण्यामुळे दासगाव विभागातील ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे.
- टी.एस.देशमुख, रायगड, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष.