महाविद्यालयाची प्रतीक्षा कायम
By Admin | Updated: January 10, 2017 07:04 IST2017-01-10T07:04:50+5:302017-01-10T07:04:50+5:30
सिडकोने एसटी महामंडळाला दिलेल्या दोन भूखंडावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन

महाविद्यालयाची प्रतीक्षा कायम
नामदेव मोरे / नवी मुंबई
सिडकोने एसटी महामंडळाला दिलेल्या दोन भूखंडावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती. वर्षभरामध्ये दोन्ही भूखंडावर नामफलक लावले आहेत; पण प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे बाळासाहेबांचे नाव असलेले हे महाविद्यालय प्रत्यक्षात कधी सुरू होणार? असा प्रश्न शिवसैनिकांना पडू लागला आहे.
नवी मुंबईच्या उभारणीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेना सत्तेत आली होती. पालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय, विष्णुदास भावे नाट्यगृह व नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली सुरू झाली; परंतु नवी मुंबईमधील सत्ताधारी व विरोधकांना बाळासाहेबांच्या योगदानाचा विसर पडला आहे. शहरात बाळासाहेबांचे स्मारक नाहीच; पण एकही महत्त्वाच्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नसल्याची खंत जुने शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत.
विद्यमान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २२ जानेवारी, २०१६ रोजी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पाच महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. या घोषणांमध्ये नवी मुंबईमधील एपीएमसीच्या फळमार्केटच्या बाजूला व आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या दोन विस्तीर्ण भूखंडावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन अभियांत्रिकी महाविद्यालय व वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. यामुळे शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले होते. एसटी महामंडळाची २५० दुरुस्ती डेपो व ३ मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांसाठी मोटारवाहन अभियंत्यांची गरज असते. यामुळे नवी मुंबईमध्ये २४० विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र महाविद्यालय व वसतिगृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या वर्षभरामध्ये महाविद्यालय उभारण्यासाठी सुरुवात झालेली नाही. यासाठीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजनही झालेले नाही. एक वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दोन्ही भूखंडावर नामफलक लावण्यात यश आले आहे. ही जागा परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाच्या मालकीची असून, ती बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयासाठी राखीव आहे. तेथे अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. लवकर प्रत्यक्ष महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू झाले नाही, तर हा फलक धूळखात पडेल व या भूखंडावर अतिक्रमण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या २३ जानेवारीपर्यंत येथे महाविद्यालयाच्या कामाची सुरुवात होणार का? याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
भूखंडाची धर्मशाळा
च्फळमार्केच्या मागील बाजूला असलेल्या भूखंडावर पूर्वी एसटी डेपो सुरू केला होता; पण तो बंद पडला आहे. येथे प्रसाधनगृहाचा वापर पूर्वी गांजाचा साठा करण्यासाठी केला जात होता. आता येथील पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी व वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. या जागेला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले असून, त्याचा वापर कोणीही करू लागले आहे.
पार्किंग सुरू करण्याचा डाव
च्एसटी महामंडळाच्या दोन्ही भूखंडावर पे अॅण्ड पार्क योजना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या मध्यस्थीने त्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही; पण अनधिकृत पे अॅण्ड पार्किंग सुरू करण्याचाही विचार सुरू आहे.
झोपड्या उभारण्याची, अतिक्रमणाची भीती
च्आरटीओ कार्यालयाजवळील एसटी महामंडळाच्या भूखंडाच्या संरक्षण भिंतीबाहेर अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. भूखंडाच्या दुसऱ्या टोकावरही अतिक्रमण झाले आहे. लवकर भूखंडाचा वापर सुरू झाला नाही, तर तेथेही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.