जि.प.साठी २८ला मतदान
By Admin | Updated: January 5, 2015 22:29 IST2015-01-05T22:29:00+5:302015-01-05T22:29:00+5:30
नव्याने निर्माण झालेल्या पालघर व ठाणे या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या

जि.प.साठी २८ला मतदान
पालघर/ठाणे : नव्याने निर्माण झालेल्या पालघर व ठाणे या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून २८ जानेवारी रोजी मतदान होऊन ३० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी रात्री १२ वाजेपासून लागू झाली आहे.तर अन्य जिल्ह्णांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकां याच वेळी होणार आहेत.
या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ ते १३ जानेवारी २०१५ या कालावधीत (११ जानेवारीचा सुटीचा रविवार वगळता) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्या सोबत जातीचे व जातप्रमाणपत्रांचे वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय, छाननीच्या वेळी मूळ जातप्रमाणपत्र व जातप्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्णाच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड या पंचायत समित्यांच्या ११० गणांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नवनिर्वाचित पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ गटांसह पालघर जिल्ह्णातील वसई, तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि पालघर या पंचायत समित्यांच्या ११४ गणांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरणे (ता. खेड), रायगड जिल्हा परिषदेच्या नवघर (ता. उरण) व शहापूर (ता. अलिबाग) तर पुणे जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी-चाकण (ता. खेड) व वालचंदनगर-कळस (ता. इंदापूर), अहमदनगर जिल्हा परिषदेच्या राजूर (ता. अकोले) व मिरी (ता. पाथर्र्डी) व कोळगाव (ता. श्रीगोंदा) या गटांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नाशिक जिल्ह्णातील येवला पंचायत समितीच्या सावरगाव, रायगड जिल्ह्णातील रोहा पंचायत समितीच्या भालगाव गणांची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता जारी राहील. निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये चैतन्य संचारले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांत निर्माण झालेली मरगळ आता झटकली जाण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीची वृत्त कळताच भेटीगाठी आणि फोना फोनी सर्वत्र सुरू झाली. उद्यापासून राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ होईल. (प्रतिनिधी)