आदिवासींना ‘दिवाळी’ भेट

By Admin | Updated: October 27, 2015 00:38 IST2015-10-27T00:38:11+5:302015-10-27T00:38:11+5:30

गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले

Visit to Tribal 'Diwali' | आदिवासींना ‘दिवाळी’ भेट

आदिवासींना ‘दिवाळी’ भेट

नामदेव मोरे, नवी मुंबई
गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन पनवेल, नवी मुंबईमधील हजारो नागरिकांनी जुनी, नवी कपडे, भांडी व इतर साहित्य जमा केले आहे. तब्बल दोन ट्रक साहित्य आतापर्यंत जमा केले आहे. हे सर्व साहित्य लवकरच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
नवी मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून गुन्हे प्रकटीकरणापासून नागरिकांशी संवाद वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. गणपती व नवरात्र उत्सव शांततेमध्ये पार पाडला. बंदोबस्त सुरू असतानाच पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त विश्वास पांढरे व परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी आदिवासींना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
शहरामधील नागरिकांना सर्व भौतिक सुविधा सहज मिळत आहेत. परंतु येथून ७६४ किलोमीटर दूर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच लाखांपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. अंगावर पुरेशी कपडे नाहीत. घरामध्ये आवश्यक भांडी व इतर साहित्य नाही. अत्यंत हालाकीचे जीवन विनातक्रार आदिवासी जगत आहेत. शहरामधील नागरिकांनी उत्सवांमधील व इतर वेळीही अनावश्यक खर्च कमी करून आपल्याकडील जुने, शक्य असेल तर नवीन कपडे, भांडी व इतर साहित्य पोलिसांकडे जमा करावे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाईल. आपली छोटीशी मदत हजारो आदिवासींचे जीवनमान उंचावू शकेल, असे आवाहन केले होते.
पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबई व पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शहरातील राजकीय पक्ष, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था व इतर नागरिकांनी स्वेच्छेने घरोघरी जाऊन कपडे व भांडी गोळा केली. या मोहिमेला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येकाने स्वेच्छेने त्यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कपडे व इतर साहित्याचे ढीग जमा होऊ लागले. अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी टेंपो भरून साहित्य पनवेलमधील परिमंडळ दोनच्या कार्यालयाकडे पाठविले. नवी मुंबईमधील एनआरआय कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीच एक टेंपो भरून साहित्य दिले. पोलिसांनी जुने कपडे देण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी नवीन कपडेही मोठ्या प्रमाणात दिले आहेत. विशेषत: व्यापाऱ्यांनी चांगल्या वस्तू व नवीन कपडे खरेदी करून आदिवासींसाठी दिले आहेत. जवळपास दोन ट्रक भरेल एवढे साहित्य संकलित झाले आहे. लवकरच हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

Web Title: Visit to Tribal 'Diwali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.