व्हीआयपी नंबरसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना घातला गंडा?

By Admin | Updated: March 11, 2017 02:26 IST2017-03-11T02:26:44+5:302017-03-11T02:26:44+5:30

प्रतिष्ठित व्यक्तींना आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांनी देशभरात अनेकांना गंडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vip number for reputable persons? | व्हीआयपी नंबरसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना घातला गंडा?

व्हीआयपी नंबरसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना घातला गंडा?

नवी मुंबई : प्रतिष्ठित व्यक्तींना आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांनी देशभरात अनेकांना गंडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४० ते ५० लाख रुपये किमतीचे मोबाइल नंबर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशाच एका प्रकरणातून एपीएमसी पोलिसांनी उच्चशिक्षित दोघा तरुणांना अटक केली आहे.
एअरटेल कंपनीचे कामगार असल्याचे भासवून आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले जात आहे. तुर्भेतील सचिन पाटील यांनाही अशाच प्रकारे अज्ञात दोघांनी साडेचार लाख रुपयांना गंडवले होते. व्हीआयपी मोबाइल नंबर मिळवून देतो. त्या दोघांनी स्वत:चे एअरटेल कंपनीचे ओळखपत्र दाखवून पाटील यांचा विश्वास संपादित केला होता. यानंतर फोनवर संभाषण करून अथवा व्हॉट्स अ‍ॅपद्वारे ते पाटील यांच्या संपर्कात होते. त्यांनी कंपनी दरानुसार सुमारे चाळीस लाख रु पये किमतीचा व्हीआयपी नंबर स्वस्तात देतो, असे सांगितल्यानंतर पाटील यांनी त्यांना टप्प्याटप्प्यांनी साडेचार लाख रु पये दिले होते. ही रक्कम त्यांच्या सांगण्यानुसार एका बँक खात्यात जमा करण्यात आली होती. तर काही रक्कम अंगडीया मार्फत नमूद ठिकाणी पोहोचवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यासोबतचा संपर्क तुटल्यामुळे पाटील यांनी एअरटेल कंपनीत चौकशी केली असता फासवणूक झाल्याचे त्यांना कळले.
याप्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार करताच, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने कोणताही सुगावा नसताना केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अवघ्या दहा दिवसांत दोघांना अटक केली आहे. विशाल गोस्वामी व अभिषेक उपाध्याय अशी त्यांची मूळ नावे असून, ते मीरारोडचे राहणारे आहेत.
विशालने कॉलसेंटरमधील नोकरी सुटल्यानंतर बालमित्र अभिषेक सोबत मिळून हा कट रचला होता. याकरिता त्यांनी दुसऱ्यांच्या नावे खरेदी केलेले बनावट मोबाइल सीम कार्ड वापरले होते. संजय प्रजापती व नरेंद्र कुशवाह अशी ते स्वत:ची नावे सांगायचे. तर पोलीस आपल्याला पकडूच शकणार नाहीत, असाही त्यांचा ठाम विश्वास होता. यानुसार व्हीआयपी नंबर खरेदीसाठी लाखो
रुपये खर्चू शकतील, अशा प्रतिष्ठित व्यक्तींना फोनवरून संपर्क साधायचे, ही रक्कम ते अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सांगायचे, काही कालावधीनंतर ती रक्कम दुसऱ्याच्या खात्यातून कशी काढायची याचाही कट त्यांनी रचलेला होता. त्यापूर्वीच एपीएमसी पोलिसांनी दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Vip number for reputable persons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.