गावांचे स्थलांतर १ जुलैपासून

By Admin | Updated: May 31, 2016 03:19 IST2016-05-31T03:19:37+5:302016-05-31T03:19:37+5:30

आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

The villages shifted from 1st July | गावांचे स्थलांतर १ जुलैपासून

गावांचे स्थलांतर १ जुलैपासून

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार बाधित गावांच्या स्थलांतरासाठी १ जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. तशा आशयाच्या सूचना संबंधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील नऊ गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. पुढील सहा-सात महिन्यांत स्थलांतरित होणाऱ्या या बांधकामधारकांना प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा देण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधितांनी भाडेतत्त्वावर स्वत:च्या निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
सिडकोने आपल्या अगोदरच्या प्रस्तावात विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांना एक वर्षाचे घरभाडे देण्याचे मान्य केले होते. परंतु ग्रामस्थांनी त्याला विरोध करीत घरभाड्याचे हे पॅकेज तीन वर्षे करावे, अशी मागणी केली होती. त्याला सिडकोनेही विरोध दर्शविला होता. अखेर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यावर निर्णायक तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार घरभाड्याचे पॅकेज १८ महिन्यांचे करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ १ जुलैपासून करण्यात येणार आहे. १ जुलै २0१६ ते ३१ डिसेंबर २0१७ या १८ महिन्यांसाठी हे पॅकेज असणार आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोच्या संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थलांतरित होणाऱ्या बांधकामधारकांना १८ महिन्यांचे एकरकमी आगाऊ घरभाडे देण्यात येणार आहे. त्यासाठी १६ जूनपासून सिडको भवन येथे विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. स्थलांतरितांच्या घरभाड्यापोटी सिडकोला तब्बल ५० कोटी रुपये खर्च होणार आहे.

Web Title: The villages shifted from 1st July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.