पदभार स्वीकारताच विजय सिंघल 'अँक्टिव्ह मोड'मध्ये; सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार
By कमलाकर कांबळे | Updated: February 27, 2024 19:47 IST2024-02-27T19:46:02+5:302024-02-27T19:47:41+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

पदभार स्वीकारताच विजय सिंघल 'अँक्टिव्ह मोड'मध्ये; सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार
नवी मुंबई : सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून ते अँक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून आले. सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला, तर मंगळवारी देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी थेट विमानतळाच्या जागेवर जाऊन कामाची पाहणी केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मरगळलेल्या सिडकोच्या विविध प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात दक्षिण नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा योजना, मेट्रोचा विस्तार, पंतप्रधान आवास योजना, कार्पोरेट पार्क, नैना क्षेत्राचा विकास, करंजाडे येथील नियोजित स्पोर्ट्स सिटी, नवी मुंबई ते मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा, पारसिक हिलमधून तुर्भे-खारघरदरम्यान बोगदा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, विविध कारणांमुळे ही कामे संथगतीने सुरू आहेत.
मागील वर्षभरापासून तर ही कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकल्पांची डेडलाईन हुकल्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रकल्पांचा खर्चही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली कामे नियोजित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पदभार स्वीकारताच या सर्व कामांचा सिंघल यांनी आढावा घेण्याचा धडाका लावल्याने मरगळलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सुस्तावलेले अधिकारी सरळ होणार?
सिडकोची प्रशासकीय घडी काहीशी विस्कटली आहे. अधिकारी आणि कर्मचारी सुस्तावले आहेत. याचा फटका दैनंदिन कामकाजाला बसला आहे. नागरिकांची कामे होताना दिसत नाहीत. विशेषत: प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. साडेबारा टक्के भूखंड योजना, नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध, सिडकोतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न जटिल बनू लागले आहेत. विजय सिंघल हे शिस्तीचे कडक आहेत. तसेच त्यांचा कामाचा उरकही दांडगा आहे. त्यामुळे सिडकोच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि शिस्त येईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.