शिरसेमध्ये दारूबंदीचा निर्णय
By Admin | Updated: February 17, 2016 02:20 IST2016-02-17T02:20:02+5:302016-02-17T02:20:02+5:30
तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची वस्ती आहे. ठाकूर आणि कातकरी समाजातील लोक कामधंदा करून आल्यावर कमाविलेला पैसा दारू पिऊन उडवतात

शिरसेमध्ये दारूबंदीचा निर्णय
कर्जत : तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची वस्ती आहे. ठाकूर आणि कातकरी समाजातील लोक कामधंदा करून आल्यावर कमाविलेला पैसा दारू पिऊन उडवतात. त्यामुळे आदिवासी समाजातील महिलांच्या पुढाकाराने एका वाडीमध्ये किंवा गावामध्ये नाही तर संपूर्ण शिरसे ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठराव करूनदेखील जे लोक दारू पिणार त्यांची आणि हातभट्टी लावतील त्यांची नावे जाहीरपणे फलकावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारिप बहुजन महासंघाने तेथील आदिवासी कुटुंबाबरोबर दारूबंदीसाठी जनजागृती करण्याचे काम केले होते. शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष भोईर यांची निर्विवाद सत्ता अनेक वर्षांपासून शिरसे ग्रामपंचायतीमध्ये आहे. भोईर यांच्या शब्दाला येथे मोठे वजन असून, ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सरपंच रतन वाघमारे आणि उपसरपंच प्रवीण देशमुख यांनी ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व गावे, आदिवासी वाड्यांमध्ये दारूबंदी व्हावी म्हणून ठराव सादर केला.
कातकरी आणि ठाकूर या आदिवासी समाजातील लोक येथे वाड्यांमध्ये वस्ती करून राहत आहेत. तेथील महिला ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबाची कैफियत सभेत मांडली. कुटुंबप्रमुख दिवसभर मेहनत करून ३०० रु पयांच्या आसपास कमाई करतो आणि रात्री घरात पोहोचेपर्यंत त्यातील अर्धे पैसे दारूच्या अड्ड्यावर जाऊन उडवतो. त्यामुळे घरातील महिलांना घर चालविणे भाग पडते.
मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागविताना त्या आदिवासी कुटुंबामधील महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीमधील आदिवासी वाड्यांतील सर्व महिलांची भूमिका लक्षात घेऊन संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरपंच वाघमारे आणि उपसरपंच देशमुख यांनी मांडलेल्या ठरावाला सदस्य मारु ती गुरव, सुमन भोईर, सीता वाघमारे, लता देशमुख, मीना काकडे, पांडुरंग चौधरी, विमल नाईक यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला. याप्रसंगी महिला पोलीस पाटील नयना भोईर तसेच वसंत वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संतोष पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)