नवी मुंबई : श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्याने संपुष्टात आणली आहे. बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असूनए किरकोळ बाजारामध्ये वाटाणा १६० ते २०० रुपये किलो दराने, तर गवारही १२० ते १६० रुपये किलो दराने विकली जात आहे. दोन आठवडे बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६४० वाहनांमधून २५०० टन भाजीपाल्याची आवक झाली. पितृपंधरवड्यामुळे मागणी वाढल्यामुळे दोन दिवसांत जवळपास प्रत्येक भाजीचे दर वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये वाटाण्याचे दर ७० ते ९० रुपये प्रतिकिलोवरून १२० ते १५० रुपयांवर पोहोचले आहेत.
किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचा वाटाणा २०० रुपये किलो दराने विकला जात असून, हलक्या मालालाही १६० रुपये मोजावे लागत आहेत. अपवाद वगळता सर्व भाज्यांचे दर किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत.
२ लाख कोथिंबीरच्या जुडीची आवक
कोथिंबीरची मागणीही वाढली असून, बाजार समितीमध्ये एकाच दिवशी २ लाख १५ हजार जुडीची आवक झाली.
होलसेल मार्केटमध्ये १० ते १४ व किरकोळ मार्केटमध्ये ३० रुपये जुडीने 3 विकली जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये पालक जुडी ३० ते ३५ रुपये, पुदिना २५ ते ३० रुपये व कांदापात २० रुपये दराने विकली जात आहे.
होलसेल व किरकोळ भाव
भाजी > होलसेल > किरकोळ
वाटाणा >१२० ते १५० >१६० ते २००
गवार >६० ते ८० >१२० ते १६०
शेवगा शेंग >५० ते ७० >१२० ते १६०
भेंडी >५० ते ७६ >१०० ते १२०
दुधी भोपळा >३० ते ४० >८० ते १००
दोडका >३० ते ५० >८० ते १००
घेवडा >३० ते ४० >८० ते १००
कारली >३६ ते ४० >८०
फरसबी >४० ते ५० >१०० ते १२०