विशेष हातांनी साकारल्या १०,००० राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST2017-07-31T01:04:41+5:302017-07-31T01:04:41+5:30
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात रेखीव नक्षी, कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत.

विशेष हातांनी साकारल्या १०,००० राख्या
नवी मुंबई : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात रेखीव नक्षी, कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. या राख्यांची निर्मिती अनेक संस्थांकडून करण्यात येत असून, अपंगत्वावर तसेच गतिमंदत्वावर मात करीत विशेष मुलांनी यापैकी बहुतांश राख्या तयार केल्या आहेत. सजावटीचे विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या विविधरंगी सुंदर अशा राख्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
हातातील कौशल्य आणि आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी सुंदर, आकर्षक अशा ४० डिझाइन्सच्या १०,००० राख्या तयार केल्या आहेत. ही मुले स्वावलंबी बनावीत, तसेच त्यांच्या बुद्धिमतेचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष मुलांनी तयार केलेल्या या राख्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विक्र ीसाठी ठेवल्या जातात. या राख्या खरेदी केल्यानंतर मुलांच्या चेहºयावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो, अशी माहिती शाळेच्या संस्थापिका शिरीष पुजारी यांनी दिली. राख्यांबरोबरच सजावटीच्या वस्तू, तोरणे, तरंगत्या मेणबत्त्यादेखील विद्यार्थी तयार करत असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली.
विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पणत्या, कंदील, कागदी पिशव्या, दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत आणि वस्तूंचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. शाळेतील फाल्गुनी व्होकेनशनल युनिटच्या वतीने या मुलांना वर्षभर विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते. धागा ओवताना हातात सुई धरण्यापासून ते मणी ओवेपर्यंत संपूर्ण काम शिकविण्यासाठी शाळेचे दहा शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. राख्या बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांना ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागला. समाजामध्ये ही मुले कुठेही कमी पडता कामा नये, या हेतूने त्यांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. सणांचे महत्त्व, त्यामागचा हेतू याची माहिती विद्यार्थ्यांना या वेळी दिली जाते.