जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू
By Admin | Updated: March 17, 2017 05:52 IST2017-03-17T05:52:57+5:302017-03-17T05:52:57+5:30
शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व साथीच्या आजारांपासून स्ांरक्षण करण्यासाठी सुधागडात पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व जनावरांना

जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू
पाली : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व साथीच्या आजारांपासून स्ांरक्षण करण्यासाठी सुधागडात पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व जनावरांना लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अशी माहिती खवली पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर रोहिणी दाभोळकर यांनी दिली आहे.
पावसाळ्यात जनावरांना विविध साथीचे आजार उद्भवू शकतात, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन खवली पशुसंवर्धन विभागातर्फे केले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनाचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लहान व मोठ्या जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे या जनावरांचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैल पशूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून सुधागड तालुक्यातील एकूण २४,२७२ पशुधनासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येणार
आहे.
या मोहिमेची सुरुवात तालुक्यातील शिरसेवाडी, लोलगेवाडी, चेरफलवाडी, खेमवाडी या गावांतून झाली असून, आतापर्यंत ४५० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण सुधागड तालुक्यात मान्सूनपूर्व लसीकरण करणार असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर मनोहर कुर्लुपे यांनी दिली आहे. (वार्ताहर)