रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरा देवास प्रयोग
By Admin | Updated: May 22, 2016 01:19 IST2016-05-22T01:19:00+5:302016-05-22T01:19:00+5:30
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरा देवास प्रयोग
राहुल वाडेकर, विक्रमगड/तलवाडा
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे.
ही फिल्टर पध्दत काय आहे? पावसाळयात छतावर पडणारे पावसाचे पाणी सध्या पाईपच्या माध्यमातून आपल्या घरच्या अंगणात किंवा अंगणाबाहेर असलेल्या विंधन विहिरीमध्ये सोडण्यात येते. हे विंधन विहिरीत सोडलेले पाणी विहिरीतून भूगर्भात खोलवर जाते व भूगर्भातील रिकाम्या झालेल्या पाणीसाठ्याच्या पोकळीमध्ये प्रवेश करते. परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन विंधन विहिरींचे पाणी भरपूर वाढते. (वार्ताहर)
>६ इंच जाडीचा व ४ फूट लांबीचा पाईप घ्यावा, त्यात वाळूचे तीन सारखे थर जाळी टाकून निर्माण करावेत. छतावरील पावसाचे पाणी ज्या मार्गानी येते, त्या बाजूस ६ मी. मी. आकाराची बारीक वाळू ठेवावी.
त्यानंतर जाळी, त्यापुढे १२ मीमी. आकाराच्या वाळूतील गोट्यांचा थर द्यावा त्यापुढे जाळी लावावी त्यानंतरच वाळूतील मध्यम आकारापेक्षा मोठया गोटयांचा ३० मीमीचा थर द्यावा. त्यापुढे जाळी टाकून या पाईपव्दारे हे पाणी विंधन विहिरीत सोडले जाते.
पावसाळयापूर्वी छत झाकून साफ करावे. पहिल्या व दुसऱ्या पावसाचे पाणी सिस्टिममध्ये असलेल्या आउटलेटव्दारे जमीनीवर सोडावे. विंधन विहिरीत जाऊ देऊ नये. विंधन विहिरीकडील झडप किंवा कापसाचा बोळा ठेवून हा फिल्टर धुता येतो. धुतलेले पाणी छताकडील टी मधून बाहेर काढावे विंधन विहिरीमधील पाणी शुध्द करण्यासाठी सोडीयम क्लोराईट वा अन्य निर्जंतुके विंधन विहीरीजवळील टी मधून टाकता येतात. अशा प्रकारे छतावरील पाण्याच्यापावसाचे पुनर्भरण केल्यास शहरातील पाणीटंचाईवर थोडयाफार प्रमाणात मात केली जाऊ शकते. पावसाळयाच्या आधीपासूनच हा प्रयोग करण्याची तयारी करता येते. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल खोल जात आहे. पावसाचे प्रमाण जरी कमी झालेले नसले तरीही पाण्याचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तिच्यावर व भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे ही येणाऱ्या भविष्य काळासाठी आवश्यक बाब बनली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याच्या वापराबाबत, बचतीबाबत व पुर्नभरणाबाबत अत्यंत जागरुक राहण्याची गरजनिर्माण झाली आहे. पावसाचे पाणी, नदीचे, ओढयांचे पाणी साठविणे, त्याचे पुनर्भरण करणे याशिवाय पर्याय नाही. आंघोळीचे पाणी, कपडे धुण्याचे पाणी, भांडे धुण्याचे पाणी साठवून ते जमिनीत जिरविणे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे ही आजची व भविष्यकाळाची गरज बनली आहे.