उरणकरांना प्रतीक्षा नेरूळ-उरण रेल्वेची
By Admin | Updated: August 6, 2016 02:27 IST2016-08-06T02:27:55+5:302016-08-06T02:27:55+5:30
नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे.

उरणकरांना प्रतीक्षा नेरूळ-उरण रेल्वेची
मधुकर ठाकूर,
उरण- मध्य रेल्वे आणि सिडको यांच्या भागीदारीत सुरू असलेल्या नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. १७६२ कोटी खर्चाचा प्रस्तावित प्रकल्प दोन टप्प्यात सुरू झाला आहे. पहिल्या टप्पा सीवूड ते खारकोपर डिसेंबर २०१७ तर खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची डेडलाइन २०१९ आहे. मात्र रेल्वेमार्गात खारफुटी आणि वन खात्याच्या जमिनीचा खोडा आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता मुंबईशी जोडणारा हा प्रकल्प मुदतीत पूर्णत्वास जाईल का, याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे.
आंतरराष्ट्रीय जेएनपीटी बंदर आणि विविध प्रकल्पांमुळे उरण परिसराचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने पसारा वाढत चालला आहे. आयात-निर्यातीच्या या वाढत्या पसाऱ्यामुळे उरण आता जगाच्या नकाशावर आले आहे. नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित शिवडी-न्हावा शेवा सेतू आदी प्रकल्पांमुळे तर व्यापारी दृष्टिकोनातून मुंबईबरोबरच उरण देशभरातील विविध रेल्वेमार्गाशी जोडले जावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. खरे तर ५० वर्षांपूर्वी पनवेल मार्गावरून थेट उरण नौदलाच्या डेपोतून मालाची वाहतूक थांबल्याने हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराविना धूळ खात पडला आहे. मात्र जेएनपीटी बंदराच्या निर्मितीनंतर या रेल्वेमार्गाचा पुन्हा एकदा वापर होण्यास सुरुवात झाली. व्यापार वृद्धी आणि परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे उभारण्याचा प्रयत्न जेएनपीटी, सिडको, रेल्वेक डून सातत्याने केला जात आहे. त्यासाठी जेएनपीटीकडूनही विविध रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील सीवूड ते खारकोपर या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. सीवूड स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत या उपनगरीय मार्गावर रेल्वे धावणार आहे. सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. पनवेल क्रि क ब्रिजसह छोट्या-मोठ्या पुलांचेही काम झाले आहे. उपनगरीय तरघर स्थानक नवी मुंबई विमानतळाशी जोडले जाणार आहे. स्थानकांसाठी डबल डिसचार्ज सुविधा, कंप्युटर सबवे आदि सुविधा असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. त्याची सुरुवातही झाली आहे.
खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाच्या कामाची डेडलाइन जून २०१९ पर्यंतची आहे. पहिला टप्पा सीवूड ते खारकोपर रेल्वेमार्ग २०१७ पर्यंत सुरू करण्यासाठी काम सुरू असले तरी उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गाची खारफुटी आणि वनखात्याच्या जमिनीचा खोड्यामुळे प्रकल्पास विलंब होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)