उर्दू शाळेत एकच शिक्षक !

By Admin | Updated: February 16, 2016 02:46 IST2016-02-16T02:46:27+5:302016-02-16T02:46:27+5:30

येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक सुमारे ९३ विद्यार्थ्यांना शिकवीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Urdu teacher in school! | उर्दू शाळेत एकच शिक्षक !

उर्दू शाळेत एकच शिक्षक !

अलिबाग : येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक सुमारे ९३ विद्यार्थ्यांना शिकवीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाच शिक्षकांची पदे मंजूर असतानाही सरकारकडून ती भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे; शिवाय एकाच शिक्षकावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सक्तीच्या शिक्षणाचा या घटनेने पुरता बोजवारा उडाल्याने पालकांमध्ये याबाबत नाराजीचा सूर आहे.
अलिबाग येथे मुस्लीम वस्ती मोठ्या संख्येने असल्याने उर्दू भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नगरपालिकेच्या शाळेमध्ये मराठीबरोबरच उर्दू माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जात आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची सोय येथे आहे. पहिली ते पाचवीसाठी दोन शिक्षक, सहावी ते आठवीपर्यंत तीन शिक्षक अशा एकूण पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र येथे गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. रिक्त जागांची भरती सरकारने अद्याप केलेली नाही.
शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिले ते आठवीच्या आठ वर्गांमध्ये ४१ मुली आणि ५२ मुले अशी एकूण ९३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे एकट्या शिक्षकाला एकाच वेळी ९३ विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. शिक्षणाचा दर्जा खालावतानाच शिक्षकावर अतिरिक्त कामाचा ताणही पडत आहे.
कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापक समितीने वेळोवेळी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र सरकारी पातळीवरून निवेदनाला केराची टोपली दाखविल्याची धारणा त्यांची झाली आहे. एकाच वेळी आम्हाला काही शंका विचारायची झाल्यास एकच शिक्षक असल्याने त्याची उत्तरे त्वरित मिळत नाहीत, असे वास्तव काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Urdu teacher in school!