उरणकरांना २० रुपयांत, दीड तासात सीएसटी-मुंबई गाठता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2024 13:09 IST2024-01-13T13:08:49+5:302024-01-13T13:09:31+5:30
तीन हजार कोटी खर्चाच्या खारकोपर-उरण दरम्यान १३ जानेवारी पासून ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार

उरणकरांना २० रुपयांत, दीड तासात सीएसटी-मुंबई गाठता येणार
मधुकर ठाकूर, उरण : उरण-नेरुळ रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्याने उरणकरांना आता २० रुपयांत आणि अवघ्या दीड तासात सीएसटी-मुंबईत पोहचणे शक्य होणार आहे. मोरा-भाऊचा धक्का,एसटी आणि नव्याने सुरू झालेल्या शिवडी-न्हावा सेतूपेक्षाही कमी खर्चात मुंबईत जाता येणार उरणकरांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.
शुक्रवारीच खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. खारकोपर-उरण हा १४.६० किमी दुहेरी मार्ग हा बेलापूर-सीवूड-उरण विभागाच्या २७ मार्ग किमी दुहेरी मार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे .ज्याची एकूण किंमत ३००० कोटी आहे. १४३३ कोटी खर्चाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेचा ३३ टक्के आणि सिडकोचा ६७ टक्के वाटा आहे. यामध्ये रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण या ४ नवीन स्थानकांसह विभागात १ महत्त्वाचा पूल, २ मोठे पूल, ३९ छोटे पूल, ३ रोड ओव्हर ब्रिज आणि ३ रोड अंडर ब्रिजचा समावेश आहे.
सध्या नेरूळ- बेलापूर आणि खारकोपर दरम्यान चालणाऱ्या ४० उपनगरीय सेवा (२० जोड्या) आता १३ जानेवारीपासून उरणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आणि त्या शेमतीखार, न्हावा-शेवा आणि द्रोणागिरी स्थानकावर थांबतील.उरण ते बेलापूर ते नेरुळ स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत सेवांची वारंवारता प्रत्येक ३० मिनिटांनी, बेलापूर ते उरण आणि नेरुळ ते उरण स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत ६० मिनिटे असेल. या विस्तारित मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत एकूण १० सेवा धावतील. ईएमयू ट्रेनच्या या विस्तारित सेवा विद्यार्थी, व्यापारी, दैनंदिन प्रवाश्यांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था पुरवून मदत होईल त्यामुळे एसईझेड क्षेत्र आणि नवी मुंबईशी संपर्क वाढविण्यासाठी मदतच होणार आहे.अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
नेरूळ -उरण रेल्वे मार्ग ५० वर्षापुर्वी प्रस्तावित करण्यात आला होता.त्यावेळी प्रकल्पाचा खर्च ४९८ कोटी होता.आता हा प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.वाशी, पनवेल,जुईनगर या मार्गावरुन दररोज ४०० खासगी इको गाड्या सुमारे चार ते पाच हजार प्रवाशांची वाहतूक करीत आहेत.आता या रेल्वे मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर उरणकरांना आता २० रुपयांत आणि अवघ्या दीड तासात सीएसटी-मुंबईत व १५ रुपयांत वाशी पर्यंत पोहचता येणार आहे.सध्या मोरा -भाऊचा धक्का ८० तर एसटीला उरण पासुन दादरपर्यत तिकिटासाठी ९० तर वाशी पर्यंत ५५ रुपये मोजावे लागतात.तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या फक्त शिवडी न्हावा सेतूच्या टोलवरच २५० रुपये मोजावे लागणार आहेत.त्यामुळे रेल्वे प्रवास सामान्य नागरिकांसाठी कमी वेळात आणि अगदी स्वस्तात होणार आहे.