दसऱ्यानिमित्त जुईनगरवासीयांना अनोखी भेट
By Admin | Updated: October 11, 2016 03:39 IST2016-10-11T03:39:51+5:302016-10-11T03:39:51+5:30
जुईनगरमध्ये अमृता विद्यालयाने मैदानाभोवती अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत महापालिकेने हटविली आहे. शाळेचे मैदान

दसऱ्यानिमित्त जुईनगरवासीयांना अनोखी भेट
नवी मुंबई : जुईनगरमध्ये अमृता विद्यालयाने मैदानाभोवती अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत महापालिकेने हटविली आहे. शाळेचे मैदान नियमाप्रमाणे परिसरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे दसऱ्याची अनोखी भेट मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडकोच्या नियोजनामधील त्रुटींमुळे जुईनगरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरामध्ये मैदानासाठी पुरेसे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. येथील अमृता विद्यालयासाठी खेळण्यासाठी मैदानाचा भूखंड दिला आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हा भूखंड परिसरातील मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची अट ठेवली आहे. पण शाळा व्यवस्थापनाने मैदानाभोवती संरक्षण भिंत बांधली होती. मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनी महापालिकेकडे केली होती. दोन वर्ष सातत्याने महापालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर आवाज उठविला होता. अखेर या प्रश्नाची दखल घेवून महापालिकेने अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत पाडली आहे. खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जुईनगरवासीयांना मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. नवरात्री उत्सवामध्येच प्रशासनाने मैदानावरील अनधिकृतपणे बांधलेली भिंत हटविली आहे. पूर्वीचे सार्वजनिक मैदान व शाळेसाठीचा भूखंड मिळून चांगले क्रीडांगण उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह औटी यांचेही आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)