अघोषित पाणीकपात

By Admin | Updated: December 8, 2015 01:01 IST2015-12-08T01:01:07+5:302015-12-08T01:01:07+5:30

मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे

Undeclared waterfall | अघोषित पाणीकपात

अघोषित पाणीकपात

नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कोपरखैरणे विभागात तर पाण्याच्या टँकरलाही वेटिंग असल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पसरला आहे. बड्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावल्याने मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईत मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही. मोरबे धरणात सध्या अत्यंत कमी पाणीसाठा आहे. धरणात साधारण पुढील तीन ते चार महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. असे असतानाही पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. परंतु पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन म्हणून पाणीकपात करणे अपरिहार्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने पाणीकपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही विभागात पाणीपुरवठ्याचे तास कमी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्याने या अघोषित पाणीकपातीमुळे रहिवाशांची तारांबळ उडत आहे.
कोपरखैरणे विभागात शुक्रवारपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही सेक्टर्समध्ये दोन दिवसांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. सोमवारी पाण्याच्या टँकरसाठीही रहिवाशांना ताटकळत बसावे लागले.
दरम्यान, विभागस्तरावर पाणीवाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत पाणीकपातीचे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Undeclared waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.