अम्युझमेंट पार्कच्या जागेवर अनधिकृत गॅरेज
By Admin | Updated: December 29, 2015 00:38 IST2015-12-29T00:38:05+5:302015-12-29T00:38:05+5:30
महानगरपालिकेने कोपरीमध्ये अम्युझमेंट पार्क उभारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु पार्क व बाजूच्या सिडकोच्या भूखंडावर गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर

अम्युझमेंट पार्कच्या जागेवर अनधिकृत गॅरेज
नवी मुंबई : महानगरपालिकेने कोपरीमध्ये अम्युझमेंट पार्क उभारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु पार्क व बाजूच्या सिडकोच्या भूखंडावर गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाचेच यास अभय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोपरीमधील तलावाच्या बाजूला असणाऱ्या भूखंडावर महापालिका अम्युझमेंट पार्क उभारत आहे. पार्क व बाजूचा सिडकोच्या भूखंडाचे क्षेत्रफळ जवळपास ११ हजार चौरसमीटर आहे. पाच कोटी रुपये खर्च करून अम्युझमेंट पार्क उभारले जात आहे. या भूखंडावर मागील काही वर्षांपासून गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. विलास भोईर या परिसराचे नगरसेवक असताना त्यांनी याविषयी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार आवाज उठविला होता. यानंतर सिडकोने व महापालिकेने गॅरेजवर कारवाई केली होती. परंतु अतिक्रमणविरोधी पथकाने पाठ फिरविताच पुन्हा त्या ठिकाणी गॅरेज उभे केले जात आहे.
गॅरेजचालकाला नवी मुंबईमधील एका नेत्यानेच अभय दिले असल्याची चर्चा सर्वजण करीत आहेत. प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर दबाव येत आहे. यामुळे महापालिका व सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण करून गॅरेजचालक लाखो रुपये कमावत आहे. (प्रतिनिधी)