खारघरमध्ये अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड
By Admin | Updated: June 21, 2016 01:40 IST2016-06-21T01:40:29+5:302016-06-21T01:40:29+5:30
सध्या शहरात कचरा व्यवस्थापनाची समस्या बिकट झाली आहे. काही ठिकाणी रोज कचरा उचलला जात नाही, तर काही भागांतून कचऱ्याची वाहतूक खुल्या वाहनांमधून होते

खारघरमध्ये अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड
वैभव गायकर, पनवेल
सध्या शहरात कचरा व्यवस्थापनाची समस्या बिकट झाली आहे. काही ठिकाणी रोज कचरा उचलला जात नाही, तर काही भागांतून कचऱ्याची वाहतूक खुल्या वाहनांमधून होते, काही ठिकाणी रस्त्यावर अथवा मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अशीच परिस्थिती सध्या खारघरमध्ये उद्भवली असून अनेक ठिकाणी अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तयार होत झाले आहेत. ग्रामपंचायती सिडकोशी समन्वय साधत नसल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे पहावयास मिळत आहेत.
खारघर शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून याठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खारघर व ओवे पेठ कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी या गावातील कचरा उचलत असतात, तर शहरी भागात सिडकोची स्वतंत्र यंत्रणा कचरा व्यवस्थापनाचे काम करीत असते. मात्र अनेक वेळा हद्दीच्या वादामुळे कचरा उचलला जात नाही. ग्रामपंचायत कर्मचारी सिडकोकडे बोट दाखवत असतात. अशा वेळी परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. सिडको शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत असते. मात्र ग्रामपंचायतीकडे अधिकृत डम्पिंग ग्राऊंड नसल्यामुळे शहरात मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जावून त्या कचऱ्याला आग लावली जाते. शहरामध्ये तीन ते चार ठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तयार होत आहेत. सेक्टर १५ नजीक अशाप्रकारे डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे रहिवाशांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. सिडको अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य यांची बैठक घेवून ग्रामपंचायत हद्दीतील कचरा सिडकोकडे द्या,आम्ही त्याची विल्हेवाट लावू असे आवाहन केले असताना देखील ग्रामपंचायत सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती आहे. खारघर, कोपरा, मुर्बी, बेलपाडा आदी गावांच्या हद्दीत कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचलेले दिसतात. विशेष म्हणजे खारघर ग्रामपंचायत जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये गणली जात असताना कचरा व्यवस्थापनाबद्दल ग्रामपंचायत फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे. करोडो रु पयांची विकासकामे खारघर ग्रामपंचायतीमार्फत केली जातात.
यासंदर्भात सिडकोचे अधिकारी के. बिर्मोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सिडकोच्या माध्यमातून आम्ही खारघर व ओवे ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक घेवून त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा सिडकोकडे द्यावा असे सांगितले होते. तरी देखील ग्रामपंचायतीमार्फत कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.