एपीएमसीमध्ये अनधिकृत बांधकाम घोटाळा
By Admin | Updated: July 16, 2016 02:11 IST2016-07-16T02:11:06+5:302016-07-16T02:11:06+5:30
पामबीच रोडवरील २२ टॉवरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पाच वर्षांपूर्वी राज्यभर गाजले होते. त्याच्या कित्येक पट जास्त अनधिकृत बांधकाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाले आहे

एपीएमसीमध्ये अनधिकृत बांधकाम घोटाळा
नामदेव मोरे, नवी मुंबई
पामबीच रोडवरील २२ टॉवरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पाच वर्षांपूर्वी राज्यभर गाजले होते. त्याच्या कित्येक पट जास्त अनधिकृत बांधकाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाले आहे. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर याची गंभीर दखल पालिकेने घेतली असून लवकरच संबंधितांना याविषयी नोटीस पाठविण्यात येणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. मसाला, भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेतला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या विरोधात ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने येथील अतिक्रमणाचे सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. बाजार समितीमध्ये मोठा बांधकाम घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी नवी मुंबईमधील पामबीच रोडवरील टॉवरमध्ये एफएसआयचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. विधानसभेत पडसाद उमटल्यानंतर सर्व टॉवरचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये २२ टॉवरमध्ये एफएसआयचे उल्लंघन झाले असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु यामधील एकच टॉवरमध्ये तीन मजल्याचे वाढीव बांधकाम केले होते. इतर टॉवरमध्ये तळमजला व इतर काही प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या टॉवरवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. परंतु पामबीचपेक्षा १०० पट जास्त अतिक्रमण बाजार समितीमध्ये झाले आहे. मसाला, फळ व भाजी मार्केटमधील ८० टक्के व्यापाऱ्यांनी वाढीव मजल्याचे बांधकाम केले आहे. मसाला व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे पोटमाळा उभारला आहे. फळ मार्केटमध्ये गाळ्यावर काही ठिकाणी दोन मजल्यांचे वाढीव बांधकाम झाले आहे. एपीएमसीकडे एफएसआय शिल्लक असल्याचे समजल्यामुळेच व्यापाऱ्यांनी हे अतिक्रमण केले आहे. पहिले अतिक्रमण करायचे व नंतर बांधकाम नियमित करून घ्यायचे षड्यंत्र सुरू आहे.
व्यापाऱ्यांनी केलेल्या वाढीव बांधकामाव्यतिरिक्तही प्रचंड अतिक्रमण मार्केट आवारामध्ये झाले आहे. प्रत्येक मार्केटमध्ये माथाडी कामगार, वारणार, वाहतूकदार, कामगार युनियन व इतरांना कार्यालये दिली आहेत. या कार्यालयांसाठी पालिकेची बांधकाम परवानगी घेतलेलीच नाही. याशिवाय भाजी व फळमधील बांधकामालाही परवानगी घेतलेली नाही. ‘लोकमत’ने या अतिक्रमणावर वारंवार प्रकाश टाकला होता. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मसाला मार्केटमध्ये कारवाई करून जवळपास ३४ गोडावून सील केले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली आहे. पालिकेने यापूर्वी ३०० ते ४०० व्यापाऱ्यांना अतिक्रमण केल्याची नोटीस पाठविली आहे. परंतु प्रत्यक्षात हा आकडा दोन हजारपेक्षा जास्त असल्याचे समोर येत आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून महापालिका लवकरच बाजार समितीला अतिक्रमणविषयी नोटीस देणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एफएसआयचा परस्पर वापर
मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना बाजार समिती संचालक मंडळाने वाढीव एफएसआय देण्याचा ठराव मंजूर केला होता. यासाठी महापालिकेकडून बांधकाम परवानगीही घेतली आहे. परंतु व्यापाऱ्यांना बांधकामाची परवानगी दिलेली नाही. परंतु येथील बहुतांश व्यापाऱ्यांनी परस्पर एक मजल्याचे बांधकाम केले आहे. याशिवाय ९० टक्के व्यापाऱ्यांनी पोटमाळे बांधले आहेत. यामुळे भविष्यात वाढीव बांधकाम नियमित झाले तरी पोटमाळे तोडावेच लागणार आहेत.
मसाला मार्केट
येथील ६६० गाळ्यांपैकी जवळपास ६०० गाळ्यांमध्ये अनधिकृत पोटमाळा किंवा वाढीव मजल्याचे बांधकाम झाले आहे. यासाठी कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही. शिल्लक एफएसआयपेक्षा दुप्पट बांधकाम झाले आहे. पोटमाळ्यांना बाजार समिती परवानगीच देत नाही. याशिवाय माथाडी, वाहतूकदार यांचीही अनधिकृत कार्यालये व पालिकेची परवानगी न घेतला स्टॉल्स उभारले आहेत.
फळ मार्केट
फळ मार्केटमध्ये १०२९ गाळे आहेत. यामधील जवळपास ९०० गाळेधारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. काहींनी पूर्ण एक मजला वाढविला आहे. अपवाद काहींनी दोन मजले बांधले आहेत. मार्केटमध्ये कँटीन, माथाडी,मापाडी, वाहतूकदार, ओपन शेड, लिलावगृह या सर्वांचे बांधकाम विनापरवाना आहे. एफएसआय वाढवून दिला तरी येथील सर्व बांधकामे नियमित होवू शकत नाहीत.
भाजी मार्केटलाही विळखा
मार्केटमध्ये ९९३ गाळे आहेत. यामधील जवळपास ८०० गाळ्यांमध्ये छोटे - मोठे अनधिकृत बांधकाम झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी पहिल्या मजल्यावर आलिशान वातानुकूलित कार्यालये तयार केली आहेत. कोणतीही परवानगी न घेतला बांधकाम केले आहे. याशिवाय स्टॉल्स व माथाडी व इतर घटकांच्या बांधकामांचाही समावेश आहे.
धान्य मार्केट
एपीएमसीमध्ये सर्वात कमी अतिक्रमण कांदा - बटाटा व धान्य मार्केटमध्ये आहे. धान्य मार्केटमध्ये हॉटेलचालकांनी वाढीव बांधकाम केले आहे.