दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागला घणसोली नोड
By Admin | Updated: July 16, 2016 02:10 IST2016-07-16T02:10:04+5:302016-07-16T02:10:04+5:30
सतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे

दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागला घणसोली नोड
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे अनेक सोसायट्यांमध्ये भीतीपोटी ठिकठिकाणी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. परंतु एकच विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेल्यामुळे उद्भवणारा हद्दीचा वाद टाळण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
सतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे घणसोली कॉलनी परिसराला गालबोट लागत आहे. घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर चौकीलगतच अनेक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांमध्ये गुन्हेगारांना आसरा मिळत आहे. तर विभागाचा विकास खुंटला आहे. एकच विभाग दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागला गेल्यामुळेही रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कॉलनीचा निम्मा भाग कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर निम्मा रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याकरिता दोन्ही पोलीस ठाण्याअंतर्गत एक-एक पोलीस चौकी असली तरी, त्याठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर रहिवाशांची नाराजी आहे. चौकीलगतच वाहनचोरी, कारटेप चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यास त्याची तक्रार घेण्याचे पोलीस टाळत असल्याचाही रहिवाशांचा आरोप आहे.
यापूर्वी सिम्प्लेक्समधील सोसायटीत एका टोळीने सशस्त्र जबरी दरोडा टाकला होता. अशा घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली आहे. पर्यायी अनेक सोसायट्यांमध्ये जागोजागी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. विभागात सुरु असलेली बांधकामे देखील गुन्हेगारी घटनांना कारणीभूत ठरत आहेत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक संजय पाटील यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झालेला आहे. लोकवस्तीपासून लांब असलेल्या या मार्गावर सुविधांचा अभाव असल्यामुळे अंधारात दुचाकीस्वारांना अडवून लुटणे, फेरफटका मारण्यासाठी आलेल्या महिलांचे मंगळसूत्र चोरणे असे गुन्हे त्याठिकाणी घडत आहेत.
घणसोली कॉलनीकरिता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. सध्या घणसोली कॉलनीचा विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अथवा घडलेल्या गुन्ह्याची तक्रार करायची असल्यास नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरून नागरिक व पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत. शिवाय अनेकदा हद्दीचा वाद उद्भवल्यास रहिवाशांना इकडून तिकडे पळावे लागत आहे.
- प्रशांत पाटील
नगरसेवक, प्रभाग ३२
आरक्षित भूखंडाचा अद्याप विकास झालेला नसल्याने त्यावर अतिक्रमण झाल्याचे पहायला मिळत आहे. काही आडोशाची ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्याठिकाणी मद्यपान, नशा करुन आपसात हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत, तर याच गुन्हेगारांना अनधिकृत झोपड्यांमध्ये लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवून जागेला कुंपण घालणे गरजेचे आहे.
- श्याम सराफ, घरोंदा
घरफोडी, सोनसाखळी चोरी अशा घटनांमुळे महिलांना घराबाहेर निघण्याची देखील भीती वाटत आहे. रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर गुन्हेगारांनी कब्जा मिळवला आहे. रात्रीच्या वेळी त्याठिकाणी झाडीमध्ये गुन्हेगारांच्या पार्ट्या रंगत असून हे भयाण दृश्य लगतच्या इमारतीमधील घरांमधून पहायला मिळत आहे. हेच गर्दुल्ले परिसरात गुन्हे करत असल्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना रस्त्याने पायी जाताना मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
-निर्मला पांडे, सेक्टर ५
सेक्टर ६ च्या परिसरात घडणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. परिसरातल्या मोकळ्या मैदानांसह रेल्वे पटरीलगत आडोशाच्या जागेत गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका रिक्षाचालकाचा मृतदेह देखील त्या ठिकाणी आढळलेला आहे. रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गैरसोय होत असून गुन्हेगारांची नजर चुकवत घरापर्यंत पोहचावे लागत आहे.
- विकास शिरसाट, सेक्टर ६