दोन अल्पवयीन मुलींची सुटका
By Admin | Updated: November 15, 2015 00:04 IST2015-11-15T00:04:27+5:302015-11-15T00:04:27+5:30
लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.

दोन अल्पवयीन मुलींची सुटका
नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केलेल्या या कारवाईत दोघांना अटक झाली आहे. रत्नागिरी व पनवेल येथे टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली.
कोपरखैरणे व ऐरोली येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना ऐन दीपावलीत घडली होती. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तपासाला सुरुवात केली होती. उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक तपास करत होते. अखेर या दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दोघीही १७ वर्षे वयाच्या आहेत. कोपरखैरणेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलींची वाशीत राहणाऱ्या सिद्धार्थ कलगुटकर याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीतून सिद्धार्थने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सोमवारी पळवून नेले. परंतु मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास केला. सिद्धार्थ मुलीला घेऊन गोवा फिरल्यानंतर तो रत्नागिरीत थांबला होता. यावेळी त्याला अटक करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.