बॉल लागल्याच्या रागातून दोन गटां हाणामारी
By Admin | Updated: June 1, 2017 05:50 IST2017-06-01T05:50:34+5:302017-06-01T05:50:34+5:30
बॉल लागल्याच्या रागातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी

बॉल लागल्याच्या रागातून दोन गटां हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉल लागल्याच्या रागातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी कुरार पोलिसांनी दोन शाळकरी मुलांसह तिघांना अटक केली आहे.
गोरेगाव (पूर्व)च्या दिंडोशी सत्र न्यायालयामागे एक मोकळे मैदान आहे. जिथे स्थानिक मुले ‘थ्रो बॉल’ खेळत होती. याच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे. तेथे सकाळी ६.४५ ते ७.३०च्या सुमारास शाखा भरते. शाखा संपवून ते कार्यकर्ते घरी निघाले असताना, या मुलांचा बॉल यातील एका स्वयंसेवकाला लागला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा काही स्थानिकांनी मध्यस्थी करत भांडण मिटविले. मात्र, पुन्हा त्या मुलांनी त्यांना आक्षेपार्ह बोलण्यास सुरुवात केल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. या प्रकारात संघाचे तीन स्वयंसेवक जखमी झाले. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर फोन गेल्यानंतर कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी कार्यकर्त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफरोज रशीद सय्यद (२२) सह, दोन शाळकरी मुलांना अटक केली आहे. ज्यातील एक मुलगा १७, तर दुसरा १५ वर्षांचा असल्याचे कुरार पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. संघाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची बाब सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, ही अफवा असून किरकोळ वादातून हे भांडण झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिबन्ना व्हनमाने यांनी सांगितले.