तुर्भेच्या नवयुवक मंडळाला चपराक
By Admin | Updated: September 15, 2015 23:32 IST2015-09-15T23:32:30+5:302015-09-15T23:32:30+5:30
तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती.

तुर्भेच्या नवयुवक मंडळाला चपराक
नवी मुंबई : तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने मंडळाला एक लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतूक कोंडी होवून नागरिकांना त्रास होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी यंदा प्रथमच नवी मुंबई पोलीस व पालिकेने ठोस पाऊल उचलत रस्त्यावर दहीहंडी तसेच गणेशोत्सव साजरा न करण्याच्या सूचना मंडळांना केल्या आहेत. त्यानुसार ७२ गणेशोत्सव मंडळांनी रस्ते मोकळे सोडून मैदाने गाठली आहेत. तर ३८ मंडळांनी पूर्ण रस्ता न व्यापता अवघ्या २५ टक्के भागातच मंडप उभारणी केली आहे.
या मंडळांना परवानगीची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने एक खिडकी संकल्पना देखील राबवली होती. त्यानंतरही तुर्भेच्या नवयुवक मंडळाने नियम धाब्यावर बसवत परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारला होता. ठाणे - बेलापूर या रहदारीच्या मुख्य मार्गावरच हा मंडप असल्याने त्याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालिकेनेही पाहणीदरम्यान या मंडळाला परवानगीपूर्वी मंडप न उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी दाद दिली नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय कोळेकर यांनी मंडळाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश विजय अचलीया यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याप्रकरणी त्यांनी मंडळाला १ लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणासह इतर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही असे प्रतिज्ञापत्रही मंडळाकडून बुधवारी लिहून घेतले जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने
प्रशासन आपल्याच खिशात असल्याचा आव आणत नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांना चपराक बसली आहे. याबाबत नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अशोक जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
मंडळाचे प्रतिनिधी तोंडघशी
-गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाची चौकशी न्यायाधीशांनी मंडळाच्या प्रतिनिधीकडे केली होती. यावेळी श्रीमंतीचा आव आणत मंडळाच्या प्रतिनिधीने ८ ते ९ लाख रुपये खर्च होत असून दररोज ४०० ते ५०० भाविक भेट देत असल्याचेही सांगितले.
-मात्र दंड स्वरूपात मुख्यमंत्री निधीसाठी किती रक्कम देणार याची विचारणा होताच मंडळाने हात आखडता घेत अवघ्या २५ हजार रुपयांची तयारी दाखवली.
-यावेळी नियमांची पायमल्ली करणाऱ्या या मंडळावर ताशेरे ओढत खंडपीठाने त्यांना १ लाख रुपयांचा दंड सुनावला. तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास वेगळा दंड आकारला जाईल असाही इशारा दिला आहे.