आरोग्याच्या लक्षवेधीवरून महासभेत गोंधळ
By Admin | Updated: September 10, 2015 00:01 IST2015-09-10T00:01:13+5:302015-09-10T00:01:13+5:30
शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये

आरोग्याच्या लक्षवेधीवरून महासभेत गोंधळ
नवी मुंबई : शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर या विषयावर शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
नवी मुंबईमध्ये मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने थैमान घातले आहे. पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या मुलांनाही डेंग्यू झाला आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनास साथ नियंत्रणामध्ये आणण्यात अपयश आले असून लोकप्रतिनिधींसह शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले व राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी लक्षवेधी मांडली होती. परंतु महापौरांनी हा विषय गंभीर असून त्यावर सविस्तर चर्चा करता यावी यासाठी शुक्रवारी विशेष महासभा बोलावण्याचे आश्वासन दिले. परंतु लक्षवेधीवर तत्काळ चर्चा करण्यात यावी. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरियाचा प्रश्न गंभीर झाला आहे असे स्पष्टीकरण दिले. परंतु शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त करून महापौरांना घेराव घातला. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महापौरांच्या आसनासमोर जावून तुम्ही कामकाज सुरू करा, असे आवाहन केले. जवळपास एक तास गोंधळ सुरू होता. सत्ताधारी व विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू असल्यामुळे अखेर महापौरांनी कामकाज सुरू केले. गोंधळामध्येच चार विषय मंजूर करून जेवणाची सुटी घोषित केली यामुळे गोंधळ थांबला. आता या विषयावर शुक्रवारी विशेष सभा होणार असून त्यामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ची दखल
‘लोकमत’ने आरोग्याच्या प्रश्नावर सातत्याने लक्ष वेधले आहे. अनेक नगरसेवकांनी लोकमत सभागृहात आणला होता. शिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी लोकमतमधील बातम्यांचा उल्लेख करून आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली.
प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी नको
महापौरांनी विशेष महासभा घेण्याचे जाहीर केल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ व घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करणे थांबवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.