ग्रीन होपच्या वतीने नवी मुंबईत वृक्षारोपण
By कमलाकर कांबळे | Updated: June 5, 2024 20:28 IST2024-06-05T20:27:14+5:302024-06-05T20:28:00+5:30
पर्यावरण दिनानिमित्त संदीप नाईक यांचे अभियान

ग्रीन होपच्या वतीने नवी मुंबईत वृक्षारोपण
नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनामध्ये मागील १९ वर्षांपासून काम करणाऱ्या ग्रीन होप या संस्थेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जागृती फेरीदेखील काढण्यात आली.
त्यानंतर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रबाळे, नेरूळ आणि सीवूडस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात पर्यावरणप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मानवी चुकांमुळे निर्सगाचा कोप होऊ लागला आहे. उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ अशी संकटे ओढवली आहेत. ही चूक सुधारण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांचा वापर करणार नाही, असा संकल्प करण्याचा सल्लादेखील त्यांनी उपस्थितांना दिला.
नवी मुंबईतील हिरवळ वाढली पाहिजे
जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या संबोधनामध्ये ग्रीन होपच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, खारफुटींची लागवड, मागेल त्याला झाड, असे अनेक उपक्रम राबविल्याची माहिती दिली. नवी मुंबईची लोकसंख्या वाढत असताना, नवी मुंबईतील हिरवळ आणि झाडांची संख्यादेखील वाढली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने झाडे लावावीत आणि जगवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.