रानसईमधील आदिवासींवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:04 IST2017-08-03T02:04:22+5:302017-08-03T02:04:22+5:30
श्वानदंशामुळे दोघांचा मृत्यू व सात जण जखमी झाल्यामुळे रानसईतील सहा आदिवासी पाड्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने

रानसईमधील आदिवासींवर उपचार सुरू
नवी मुंबई : श्वानदंशामुळे दोघांचा मृत्यू व सात जण जखमी झाल्यामुळे रानसईतील सहा आदिवासी पाड्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने थेट गावामध्ये जाऊन विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक थेट गावामध्ये आल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूच्या डोंगरावर असलेल्या रानसईतील सहा आदिवासी पाड्यांकडे श्वानदंशाच्या घटनांमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनिकेत रवींद्र शिंगवा व धर्मी आयत्या दोरे या दोघांचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय कमळी नामदेव शिंगवा, आयत्या राघो दोरे, महेश भास्कर दोरे, सुजल दमेश दोरे, बबलू सोमा लेंडे यांनाही श्वान दंश झाला आहे. अनिकेतने चावा घेतल्याने त्याचे आजोबा धावू राया शिंगवा जखमी झाले असून जखमींच्या संपर्कात राहिल्याने किरण वामन दोरे या लहान मुलालाही बाधा झाली आहे. कुत्रा चावल्यानंतर तत्काळ रेबिजचे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. परंतु याविषयी आदिवासी बांधवांना काहीही माहिती नसल्याने त्यांनी फक्त झाडपाल्याचे औषध घेतले, परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही. दोघांना जीव गमवावा लागला व इतर जखमींना अंगाला खाज येणे व इतर त्रास होवू लागल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
होते.
गावातील जवळपास ३५ नागरिकांनी कोप्रोली आरोग्य केंद्रामध्ये जावून प्रतिबंधात्मक लस घेतली होती. तेथील लस संपल्याने पाच जणांनी इतर ठिकाणच्या आरोग्य केंद्रामध्ये लस घेतली होती. अनिकेत शिकत असलेल्या आश्रमशाळेतील ७० पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती. पण प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांवर मात्र औषधोपचार उपलब्ध करण्यात आले नव्हते. ‘लोकमत’ने याविषयी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उरणचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी तत्काळ कोप्रोलीतील डॉक्टरांचे पथक रानसईमध्ये पाठविले.
आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने बुधवारी रानसईमधील प्रत्येक घरी जावून आरोग्य शिबिराविषयी माहिती दिली. गावामध्येच लस उपलब्ध करून दिल्यामुळे आदिवासी बांधवांनी शिबिरामध्ये गर्दी केली होती. कोणालाही बाधा होवू नये व मनातील भीती जाण्यासाठी सर्वांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. ज्यांना कुत्रा चावला आहे त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत.