रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची झाडाझडती
By Admin | Updated: July 6, 2017 06:49 IST2017-07-06T06:49:52+5:302017-07-06T06:49:52+5:30
रेल्वे पोलिसांकडून बुधवारी ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. अचानकपणे राबवलेल्या या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये

रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रेल्वे पोलिसांकडून बुधवारी ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. अचानकपणे राबवलेल्या या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या वेळी संशयित प्रवाशांकडील बॅगांची झाडाझडती घेण्यात आली.
रेल्वे स्थानक व रेल्वेतील संभाव्य दहशतवादी कारवाया हाणून पाडण्याच्या उद्देशाने प्रत्येक आठवड्याला विशेष तपास मोहीम राबवली जात आहे. यानुसार बुधवारी सकाळी ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर ही मोहीम राबवण्यात आली. वडाळा, पनवेल व वाशी रेल्वे पोलिसांच्या महिला व पुरुष पथकांनी संयुक्तरीत्या ही तपास मोहीम राबवली. यावेळी रेल्वेच्या सर्व डब्यांमधील महिला तसेच पुरुष प्रवाशांची चौकशी करून संशयितांकडील बॅगांची झाडाझडती घेतली. प्रवाशांना, स्थानकातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कसलीच पूर्वकल्पना न देता रेल्वे पोलिसांनी ही मोहीम राबवली. त्यामुळे पोलिसांकडून सुरू असलेल्या झाडाझडतीमागे काही दहशतवादाचे सावट आहे का ? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला होता. मात्र या विशेष मोहिमेत कोणावरही कारवाई झालेली नसल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस. एच. पाटील यांनी सांगितले. तर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या उद्देशाने यापुढेही मोहीम राबवली जाणार आहे.