प्रवास एका सायकलपटूचा

By Admin | Updated: March 8, 2017 04:43 IST2017-03-08T04:43:13+5:302017-03-08T04:43:13+5:30

वय पन्नाशीकडे झुकलेले, उत्साह मात्र विशीतल्या तरुणीसारखा, उन्ह-पावसाची तमा न बाळगता, पर्यावरण संवर्धनासाठी असो, वा ‘बेटी बचाव’ अभियान, पनवेलच्या वंदना भावसार

Travel a cyclist | प्रवास एका सायकलपटूचा

प्रवास एका सायकलपटूचा

- पद्मजा जांगडे

वय पन्नाशीकडे झुकलेले, उत्साह मात्र विशीतल्या तरुणीसारखा, उन्ह-पावसाची तमा न बाळगता, पर्यावरण संवर्धनासाठी असो, वा ‘बेटी बचाव’ अभियान, पनवेलच्या वंदना भावसार यांची सायकल कायम तयार...
मूळच्या मनमाड येथील वंदना यांचे शिक्षण एमकॉमपर्यंत झाले आहे. मुले मोठी झाल्याने घर संसारातून काहीशा मोकळ्या झालेल्या त्यांनी वयाच्या ४२व्या वर्षी, २०१३पासून सायकल चालवण्यास नव्हे, तर सायकलपटू म्हणून नवी ओळख निर्माण केली.
गेल्याच महिन्यात १४ फेब्रुवारीला ‘बेटी बचाव’चा नारा देत त्यांनी ‘रण आॅफ कच्छ’चा दौरा सायकलवरून पूर्ण केला.
बीच, जंगलसफारी, प्रेक्षणीय स्थळांना तर आपण नेहमीच भेट देतो. मात्र, पांढरी शुभ्र मिठागरे पाहायची असल्यास कच्छशिवाय पर्याय नसल्याचे वंदना सांगतात. मिठाच्या रणातून म्हणजे विस्तीर्ण पठारातून सायकल चालविण्याचे धाडस त्यांनी दाखवले आणि ते यशस्वीरीत्या पूर्णही केले. त्यांच्यासह आणखी ९ जण या मोहिमेत सहभागी होते.
सायकलने प्रवास करताना लोकांशी थेट संपर्क येतो आणि या जनसंपर्काचा उपयोग सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन वंदना आणि त्यांच्या टीमने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देत गुजरातकडे कूच केली. महाराष्ट्राबरोबरच गुजरातचा सहभागही विकसनशील राज्यात होत असला, तरी कच्छमध्ये अजूनही बालविवाह होतात. त्यामुळे बहुतांश मुली आपले शालांत शिक्षणही पूर्ण करू शकत नाही. या ठिकाणी शैक्षणिक जागृतीची गरज लक्षात घेऊन त्यांच्या चमूने ‘रण आॅफ कच्छ’च्या आपल्या दौऱ्यात ‘बेटी बचाव... बेटी पढाव...’चा नारा दिला होता.
आतापर्यंत सायकलवर त्यांनी मोहिमा पार केल्या आहेत. यात गोवा ते कन्याकुमारी हा १२०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी १२ दिवसांत पूर्ण केला आहे. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये ‘सेव्ह अवर सह्याद्री’ची हाक देत त्यांनी नवापूर ते महाबळेश्वर मोहीम फत्ते केली आहे. याशिवाय महिन्या-दोन महिन्यांतून पनवेल ते खंडाळा, लोणावळा, अलिबाग असा त्यांचा सायकलप्रवास सुरूच असतो.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रित करण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जातो. मात्र, त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणारे मात्र थोडेस दिसतात. वंदना यांनी घरातील जबाबदाऱ्यांबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर त्याला सामाजिक बांधीलकीचीही जोड दिली आहे.

- सायकल चालवणारी व्यक्ती पैसा आला की दुचाकी, चारचाकी गाडी घेते. मात्र, त्यानंतर सायकल चालवणे अनेकांना कमीपणाचे वाटू लागते. अशाच व्यक्ती ठरावीक काळानंतर वाढलेले शरीर कमी करण्यासाठी पुन्हा सायकलचा आधार घेताना दिसतात.
- वंदना मात्र सायकलस्वारी हा आपला छंद असल्याचे सांगतात. त्यांनी आजवर अनेक सायकलिंगच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले असून अनेकांना मार्गदर्शनही केले आहे. सायकलवर स्वार होऊन भविष्यात मनाली ते ट्रान्स हिमालय अंतर पार करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘रण आॅफ कच्छ’ मोहिमेत अमरापर ते रावेची माता असे १८ कि.मी.चे रण सायकलने क्र ॉस करताना चांगलीच कसरत करावी लागली. जाड मीठ वरवंट्याने वाटताना जसा आवाज व्हावा, तसा खरबरीत आवाज मिठाच्या रणातून जाताना सायकलच्या टायरचा व्हायचा. काही ठिकाणी वरवर मिठाचे पापुद्रे दिसायचे. मात्र, आत टायर फसतात की काय? अशी भीती वाटायची. रण सफरीबरोबरच ढोलवीर, हडप्पाकालीन नागरी संस्कृती असलेल्या नगरात, नरोना गावातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ‘रोगण आर्ट’, लाकडावरील लाख वर्क, लेदर व घंटा कामही या सायकलरूटवर बघता आले. - वंदना भावसार

Web Title: Travel a cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.