परिवहन कंत्राटींना वेतन मिळाले
By Admin | Updated: November 11, 2015 00:08 IST2015-11-11T00:08:53+5:302015-11-11T00:08:53+5:30
मीरा-भार्इंदरची परिवहन सेवा चालवणाऱ्या कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये तडजोड होऊन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन रोखीने देण्यात आले

परिवहन कंत्राटींना वेतन मिळाले
मीरा रोड : मीरा-भार्इंदरची परिवहन सेवा चालवणाऱ्या कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये तडजोड होऊन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन रोखीने देण्यात आले तर ५ वर्षांची सेवा असताना भविष्य निर्वाह निधीचा केवळ १५ महिन्यांच्या रकमेचा धनादेश थेट कर्मचाऱ्याच्या नावे देण्यात आला.
२०१० मध्ये पालिकेने पीपीपी तत्त्वावर परिवहन सेवा कॅस्ट्रलला चालवण्यास दिल्यापासून काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. सेवा बंद करतेवेळी सुमारे ४५० कर्मचारी कामास होते. काहींचा आॅगस्ट तर काहींचा सप्टेंबर, आॅक्टोबर असा पगार तसेच भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने थकवला होता. ठाणे उपकामगार आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत ठेकेदारास ७ नोव्हेंबरपर्यंत थकीत पगार देण्यास सांगितले होते.
त्या अनुषंगाने रविवारी उल्हासनगर येथे कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. ठेकेदार व डॉ. पा.रा. किनरे यांची राष्ट्रीय कामगार संघटना यांच्यात तडजोड झाली. त्यानुसार, थकीत पगार रोखीने देण्यात आला. तर, तडजोड म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या ५ वर्षांच्या थकबाकीऐवजी केवळ १५ महिन्यांच्या रकमेचे धनादेश देण्यात आले. डिसेंबर महिन्यातील हे धनादेश असून सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी तडजोडीस विरोध केल्याने त्यांचा पगारही दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आमच्या संघटनेनेच तडजोड केली. शेवटी, कर्मचारी किती लढणार, असा सवाल करत जे मिळेल ते घ्यावे लागेल, अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.