तस्करी करणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: October 28, 2015 23:26 IST2015-10-28T23:26:30+5:302015-10-28T23:26:30+5:30
येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

तस्करी करणारी टोळी जेरबंद
रोहा : येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या टोळीच्या मुख्य म्होरक्यासहित अन्य दोन जण अद्याप फरार आहेत. पोलिसांनी हत्यारासहित पंजा जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसऱ्या पंजाची तस्करी मुरुड तालुक्यात झाली असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
कोकवन येथे मुरुड - सुपेगाव मार्गावर गोठणवाडी गावापासून चारशे मीटर अंतरावर जाऊचा मळा या ठिकाणी शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासामध्ये साठ किलो वजनाचा बिबट्या अडकून मृत झाल्याची घटना १२ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती. बिबट्याचा पायाचे पंजे शस्त्राने छाटून नेल्याने या बिबट्याच्या मरणाबाबत चर्चेला उधाण आले होते.
या घटनेची दखल वनखाते व पोलिसांनी घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. मिळालेलया गुप्त माहितीनुसार वनखाते व रोहा पोलिसांनी याच भागात राहणारा हरी नागू वाडकर याच्या मुसक्या आवळताच त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या शेतात ही घटना घडली ती शेती कसणारा शेतकरी गंगाराम काशिनाथ पाटील यांना पोलिसांनी अटक करताच त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार घटनेदरम्यान पहारा करणारा नजीर महम्मद भुरे याला देखील रविवारी सायंकाळच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हरी वाडकर याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत बिबट्याचा पंजा छाटण्यासाठी वापरलेल्या शस्त्रासहित चोरलेला पंजा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या पंजे तस्करी प्रकरणातील मुख्य म्होरक्या हरी वाडकर याचा जवळचा नातेवाईक असून त्याने अन्य एका ग्रामस्थाच्या साथीने हा पंजा मुरुड तालुक्यातील एका श्रीमंत व्यक्तीला विकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सापळ्यात तीन आरोपी सापडताच या मुख्य म्होरक्याने गावातून पलायन केले. (वार्ताहर)