वाहतूककोंडीतून सुटका!

By Admin | Updated: June 4, 2016 01:51 IST2016-06-04T01:51:44+5:302016-06-04T01:51:44+5:30

खारघर शहराचा विकास, लोकसंख्यावाढीमुळे येथील कोपरा पुल वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची पुलावर मोठी कोंडी होत असल्याने अनेकदा चालकांमध्ये वादही

Traffic rescued! | वाहतूककोंडीतून सुटका!

वाहतूककोंडीतून सुटका!

वैभव गायकर, पनवेल
खारघर शहराचा विकास, लोकसंख्यावाढीमुळे येथील कोपरा पुल वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची पुलावर मोठी कोंडी होत असल्याने अनेकदा चालकांमध्ये वादही निर्माण झाले आहेत. आता सिडकोकडून याठिकाणी नवीन पुल उभारण्यास सुरुवात करण्यात आल्याने खारघरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
कोपरा पुलावर एकावेळी केवळ एकाच बाजूची वाहतूक होत असल्यामुळे दुसऱ्या बाजूच्या वाहनांना वीस ते तीस मिनिटे ताटकळत थांबावे लागते. यावर सिडकोने तोडगा काढला असून जुन्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
अनेक महिन्यांपासून कोपरा पुलाला पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी होत आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील याकरिता सिडकोकडे पाठपुरावा केला होता. मात्र सिडकोच्या कामाला नवी मुंबई महानगर पालिकेचे विघ्न येत होते.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी खारघर शहरामधून गेली आहे. या पुलावर नव्याने पूल बांधण्यासाठी जलवाहिनी हटवणे गरजेचे होते.
खारघरमधील सिडको अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त स्तरावर पत्रव्यवहार करून देखील नवी मुंबई महानगर पालिकेने ही जलवाहिनी हटविली नाही. मात्र शहरामधील नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे व पुलावर होणाऱ्या नेहमीच्या भांडणांमुळे सिडकोने याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उड्डाणपूल उभारणीचा निर्णय घेतला आहे.
सिडकोचे खारघरमधील प्रशासक प्रदीप डहाके यांनी याबाबत निर्णय घेवून हा प्रश्न मार्गी लावला आहे. नवीन पुलाखालून पाणी जाण्यासाठी २२ पाइप टाकण्यात आले आहेत.
आठवडाभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे कोपरा येथील वाहतूक कोंडी रोखता येणार असल्याची माहिती सिडको प्रशासक प्रदीप डहाके यांनी दिली.

कोपरा पुलावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या गंभीर बनत चालली होती. यासंदर्भात अनेक तक्र ारी आल्या होत्या. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होते. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले असून थोड्याच दिवसात हा पूल पूर्ण होईल. त्यामुळे याठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.
- प्रदीप डहाके, प्रशासक, खारघर

Web Title: Traffic rescued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.