वाहतूक पोलिसांच्या चौकीत फेरीवाल्यांचे गोडाऊन !

By Admin | Updated: July 3, 2016 03:28 IST2016-07-03T03:28:03+5:302016-07-03T03:28:03+5:30

वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूक पोलीस चौकीला अनधिकृत फेरीवाल्यांच्या गोडाऊनचे स्वरूप आले आहे. फेरीवाले त्यांचे साहित्य चौकीमध्ये ठेवत असून, चौकीची एक चावीही त्यांच्याकडे असते.

Traffic Police chowk foxes Godown! | वाहतूक पोलिसांच्या चौकीत फेरीवाल्यांचे गोडाऊन !

वाहतूक पोलिसांच्या चौकीत फेरीवाल्यांचे गोडाऊन !

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूक पोलीस चौकीला अनधिकृत फेरीवाल्यांच्या गोडाऊनचे स्वरूप आले आहे. फेरीवाले त्यांचे साहित्य चौकीमध्ये ठेवत असून, चौकीची एक चावीही त्यांच्याकडे असते. यामुळे पोलीसच अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याची टीका नागरिक करू लागले आहेत.
वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. येथील वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांचा दरारा राहिलेला नाही. सिडकोने या ठिकाणी पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्याचा वापर पोलिसांपेक्षा अनधिकृत फेरीवालेच जास्त करीत आहेत. येथील ज्युस सेंटर व इतर फेरीवाले रात्री शिल्लक राहिलेली फळे व इतर साहित्य पोलीस चौकीमध्ये ठेवतात. साहित्य ठेवण्यासाठी त्यांच्याकडे चौकीची एक चावीही देण्यात आली आहे. सकाळी पोलिसांच्या अगोदर ते चौकी खोलून साहित्य बाहेर घेतात. रोज सकाळी व रात्री चौकीतून फेरीवाले साहित्य घेत असल्याचे चित्र पाहून नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
वाहतूक चौकीला फेरीवाल्यांनी गोडाऊन बनविले असून, त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष सुरू गेले आहे. पोलीसच फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्यामुळे नागरिक पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करीत आहेत. ज्या पोलिसांनी फेरीवाल्यांना अभय दिले आहे त्यांची चौकशी करावी व पोलीस चौकीचा दुरुपयोग थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

Web Title: Traffic Police chowk foxes Godown!