खारघर सबवेतील वाहतूककोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:26 IST2019-08-27T23:26:22+5:302019-08-27T23:26:33+5:30
३३ लाखांचा खर्च अपेक्षित : पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका

खारघर सबवेतील वाहतूककोंडी सुटणार
पनवेल : खारघर रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात सिडकोने कामाला मंजुरी दिली असून सुमारे ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सायन-पनवेल महामार्गावर खारघर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने भुयारी मार्ग बांधला आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सीबीडीकडे जाण्यासाठी याच सबवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिक्षा आणि इतर वाहनांच्या वाहतुकीसाठी खारघर रेल्वे स्थानक आणि बेलपाडाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. मात्र, येथील दोनपैकी केवळ एकच मार्गिका सुरू आहे. दोन मार्गिकेपैकी एक मार्गिका वाहनासाठी तर दुसरी मार्गिका पादचाऱ्यांसाठी अशी वाहतूक व्यवस्था आहे. दरम्यान, शहराची व्याप्ती वाढल्याने सबवे अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे.
येथील वाहतूककोंडी लक्षात घेता नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी सिडको प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत सिडकोने दुसरी मार्गिकाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सबवेमधून दोन्ही बाजूंनी वाहनांना ये-जा करता येणार आहे. याकरिता ३३ लाखांचे काम सिडकोने मंजूर केले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
भुयारी मार्गात पादचाºयांसाठी पदपथ तयार करून लोखंडी रेलिंग उभारले जाणार आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनांसाठी वेगवेगळे मार्ग राहतील. त्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा निघेल.
- संजय पुदाळे,
कार्यकारी अभियंता,
सिडको