वाहतूक नियमांतील हेल्मेट सक्ती फक्त सामान्य नागरिकांसाठीच!

By Admin | Updated: March 15, 2016 00:58 IST2016-03-15T00:58:52+5:302016-03-15T00:58:52+5:30

हेल्मेट सक्तीच्या नावाखाली पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांना रोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस

Traffic helmet forced only for ordinary citizens! | वाहतूक नियमांतील हेल्मेट सक्ती फक्त सामान्य नागरिकांसाठीच!

वाहतूक नियमांतील हेल्मेट सक्ती फक्त सामान्य नागरिकांसाठीच!

- नामदेव मोरे, नवी मुंबई
हेल्मेट सक्तीच्या नावाखाली पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांना रोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस स्वत: मात्र हेल्मेटचा वापर करत नाहीत. पोलीस कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले असून, पक्षपातीपणाविषयी तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे.
अपघातामध्ये गंभीर दुखापत अथवा मृत्यू होवू नये यासाठी मोटारसायकलस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवी मुंबईमध्ये अरविंद साळवे यांनी वाहतूक उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची मोहीमच सुरू केली आहे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात रोडवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी स्वत:च्या मनाप्रमाणे नियमाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाईचे प्रमाण वाढविले आहे. खारघर ते पनवेल परिसरात व नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. ज्यांचा वशिला आहे त्यांना सोडून दिले जाते. ज्यांचा वशिला नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांमधील नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे नागरिकांवर हेल्मेट सक्ती लादणारे पोलीस स्वत: मात्र हेल्मेटचा वापर करण्याचे टाळत आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, पनवेल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील पोलीस कर्मचारी हेल्मेट न घालताच मोटारसायकल चालवत आहेत. सायन - पनवेल महामार्गावरही पोलीस वेगाने मोटारसायकल घेवून जात असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
वाहतूक पोलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विविध ठिकाणी उभे असतात. त्यांच्यासमोरून पोलीस बिनधास्तपणे कायद्याचे उल्लंघन करून जात असताना पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. अनेक वाहतूक पोलीस गणवेशात असतानाही हेल्मेटचा वापर करत नाहीत. वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१३ मध्ये ३७,८६६ दुचाकीस्वारांवर कारवाई केली होती. वर्षभर रोज दीडशे ते दोनशे दुचाकीस्वारांकडून दंड वसूल केला जात आहे. सामान्य नागरिकांनी हेल्मेट न घालता मोटारसायकल चालविली तर त्यांचा अपघात होवून जीवितहानी होवू शकते. मग पोलिसांचा अपघात झाला व त्यांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांचा अपघातामध्ये मृत्यू होवू शकत नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटचा वापर
पोलिसांच्या हेल्मेट सक्तीमुळे आयएसआयचा बोगस ट्रेडमार्क असणाऱ्या हेल्मेटचा खप वाढला आहे. महामार्ग व महत्त्वाच्या रोडच्या बाजूलाच २५० ते ४०० रुपयांना हेल्मेटची विक्री होत आहे. अशाप्रकारचे हेल्मेट घातल्याने अपघातामध्ये मृत्यू होण्याचीच शक्यता जास्त असते. परंतु अशा निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विक्री करणाऱ्यांवर मात्र कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही.

- वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१३ मध्ये ३७,८६६ मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली होती. गतवर्षी हा आकडा ५५,७२९ एवढा झाला आहे.

Web Title: Traffic helmet forced only for ordinary citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.